पंढरपूर पोटनिवडणूक : राष्ट्रवादीनंतर आता भाजपचीही डोकेदुखी वाढली

BJP-NCP - Maharastra Today
BJP-NCP - Maharastra Today

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची होणारी पोटनिवडणुक खूपच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठी अडचण उभी ठाकली आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करुन राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण केला आहे. तर आता भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.

भाजपनं प्रशांत परिचारक यांची समजूत काढून पंढरपूरच्या रिंगणात समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून आतापर्यंत तब्बल ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

दुसरीकडे पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटलांच्या वक्तव्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत नवे वळण ;  देवेंद्र फडणवीस उमेदवार मागे घेणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button