पंढरपूर पोटनिवडणूक : अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्याला मारहाण

Ajit Pawar - Jayant Patil - Maharastra Today

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या चाचपणीसाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भालके समर्थकांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव असल्याचे उघड झाले आहे.

विद्यार्थी सेवक किरण घोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून भालके कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याची मागणी केली होती. भालके गटाचे वर्चस्व असणाऱ्या विठ्ठल कारखान्याचे कामगार वेतन व शेतकऱ्यांची देणी थकली असल्याने विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळू नये, असे किरण घोडके यांनी पत्रात नमूद केले होते. याचाच राग मनात ठेवून भालके समर्थकांनी भरसभेत किरण घोडके यांना जबरदस्त मारहाण केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER