विठ्ठला,धन्यवाद यांच्यातले मतभेद संपवल्याबद्दल..

आषाढी वारी होणार, पादुका वाहनातून वा हवाई मार्गे पंढरपूरला जाणार

Pandharpur Ashadi Wari

Shailendra Paranjapeआषाढी वारीची परंपरा अखंडित राहणार आहे. वारी यंदा सोशल डिस्टन्सिंग पाळून, साधेपणानं होणार असली तरी ती पायी न होता पादुका वाहनातून किंवा हवाई मार्गे पंढरपूरला पोचतील, असं आज ठरवण्यात आलंय. रस्त्याने वाहनातून वारी झाली तरी एक आकडी संख्येनं म्ङणजे जास्तीत जास्ती नऊ लोक पालखीबरोब राहतील, असंही ठरवण्यात आलंय. वारी अखंडित राहणार या आनंदाच्या बातमीबरोबरच या निर्णयावर राजकीय पक्ष एका सुरात बोलताहेत, ही विठ्ठलाचीच कृपा म्हणायला हवी.

ही बातमी पण वाचा:- आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय

पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय आणि वारकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशांनुसार वारी पार पाडली जाईल, याची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलंय.

राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा असून ती अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. मात्र पादुका हवाई मार्गानेच जातील वा रस्त्याने हे आज स्पष्ट होऊ शकलेले नाही. यासंदर्भात विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे आणि याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दूरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमधे रुग्णांची संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आज सर्वानुमते हा मिर्णय घेण्यात आला.

अगदी लॉकडाऊन असो वा परराज्यातले मजूर घरी पाठवणं असो, केंद्राची मदत असो की राज्य सरकारची करोनाबद्दलची कामगिरी, सरकार आणि विरोधी पक्ष आपापल्या राजकीय भूमिकेनुसारच वागल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळं पंढरपूरच्या वारीच जसं हौशे, गवशे, नवशे सारेच एका मार्गावर चालतात, भेद विसरतात तसंच वारीसाठी का होइना, पण सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र आलेत, हे करोना घालवण्यासाठीही घडो, हीच पंढरपूरच्या विठ्ठलचरणी प्रार्थना.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER