पंढरीची वारी यंदा विथ सोशल डिस्टन्सिंग

Pandhari Wari

Shailendra Paranjapeपंढरपूरची वारी म्हणजे आषाढी एकादशीला पायी चालत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, मुखानं देवाचं नाव घ्यायचं आणि वाटेत मिळेल ते  खाऊन गुजराण करत शेकडो किलोमीटर चालत जायचं. पंढरपूरची वारी…आषाढी आणि कार्तिकी एकादशीची ही परंपरा आणि वारी कदाचित जगात एकमेव सामूहिक कृत्य असेल जे पिढ्यान्-पिढ्या आणि शतकांपासून सुरू आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट… असं म्हणत वारी करणारे वारकरी  पिढ्यान्-पिढ्या  विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला….असं म्हणत मार्गक्रमण करत असतात. त्या वारीत जातपात, धर्म-पंथ सगळं गळून पडतं आणि गावोगावचे वारकरी महिनाभरात र्षभराचं आध्यात्मिक टॉनिक घेऊन शेतीच्या रामरगाड्यात पुन्हा रममाण होतात. प्रपंच कारणी लावतात. मुख्य दोन पालख्या पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. एक म्हणजे आळंदी ते पंढरपूर आणि दुसरी देहू ते पंढरपूर. अर्थातच या दोन पालख्या संत ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकारामबाबांच्या पादुका घेऊन लाखो वारकरी वर्षानुवर्षे पंढरपूरकडे रवाना होतात.

वाटेत ठरलेले मुक्काम, ठरलेली गोल रिंगणे आणि शेवटी देवाचा धावा, या मार्गाने शेवटचं वाखरीचं रिंगण करून आषाढी एकादशीला विठूरायाच्या भेटीनं लाखो वारकरी तृप्त होतात. कोरोना भयग्रस्ततेनं जगाला विळखा घातलेला असताना आणि सामूहिक कृत्यं तर सोडाच; पण घराबाहेर यायलाही बंदी झालीय. त्यामुळं वारी होणार की नाही, अशी साशंकता होती; पण आजच म्हणजे मंगळवारी पुण्यामध्ये संबंधित संस्थानं म्हणजे देहू आणि आळंदी देवस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर संबंधित यांची बैठक झाली.

त्यात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनामुळं घालण्यात आलेले निर्बंध पाळून पालख्या काढण्याचं प्राथमिक पातळीवर सर्वानुमते ठरवण्यात आलंय. त्यामुळं यंदाची वारी नेहमीपेक्षा वेगळी होणार; मात्र त्यात वर्षानुवर्षे पाळल्या गेलेल्या परंपरा पाळल्या जातील, ही अपेक्षा आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून झूमद्वारे गप्पा रंगवणाऱ्या सर्वांनीच पंढरपूरच्या वारीचं, पालख्यांचं टीव्ही वाहिन्यांद्वारे दर्शन घ्यावं, ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. जिल्हाधिकारी राम यांच्या म्हणण्यानुसार वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे.

कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थानप्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या  स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील आणि देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी प्रशासनाला आश्वस्त केलंय की, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवणार अहोत. ते म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित राहावी यासाठी आवश्यक त्या सुविधा शासनाकडून मिळतील ही अपेक्षा आहे. विविध संस्था, दिंडीकरी, हौशे, गवशे, नवशे वारीत दरवर्षीच येतात; पण वारीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. पेरण्या आटपून वारीत गेलेला वारकरी घरी परत येतो, तो पाऊस, समृद्धी आणि संपूर्ण वर्षभरासाठीच्या सौख्याचा ठेवा घेऊन. तसंच यंदाच्या वारीचंही होवो आणि विठूमाउली महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला कोरोनामुक्त करो, हीच विठूचरणी प्रार्थना !

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला