पंचकर्म चिकित्सा – विरेचन कर्म

Vicherem

वमन पंचकर्म आपण आधीच्या लेखात वाचले असेल. मुखाव्दारे ओकारी स्वरुपात दोषांना बाहेर काढणे म्हणजे वमन कर्म होय. कफ दोषाकरीता वमन प्रामुख्याने केले जाते. याविरुद्ध आहे विरेचन पंचकर्म. जुलाबाव्दारे शरीरातील वाढलेले दोष बाहेर काढणे म्हणजे विरेचन पंचकर्म आहे. पित्तदोषाची प्रधान किंवा मुख्य चिकित्सा विरेचन सांगितली आहे.

आयुर्वेदात स्वास्थ्यरक्षण यावर देखील तेवढाच भर दिला आहे जेवढा व्याधीच्या चिकित्सेवर. ऋतुनुसार पंचकर्म चिकित्सा हा स्वास्थ्य रक्षणार्थ उपाय आहे. ज्याप्रमाणे वमन कर्म ऋतुनुसार वसंत ऋतुत वाढलेल्या कफ दोषाच्या निर्हरणार्थ सांगितला आहे तसेच शरद ऋतु (आक्टोबर नोव्हेंबर) च्या काळात पित्तदोषाचा स्वाभाविक रित्या प्रकोप होतो शरीरात वाढतो म्हणून शरद ऋतुत विरेचन पंचकर्म करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढे शरीरात पित्ताचे विकार होत नाहीत. आरोग्य टिकविण्याकरीता हा उपाय आहे.

काही व्याधी अशा आहेत की ज्यात विरेचन कर्म खूप उपयोगी ठरते. पित्तविकार, रक्तविकार, कुष्ठ प्रमेह, भगंदर, कामला, मलाशय संबंधी व्याधी, कृमिरोग, मलावष्टंभ, स्त्रीरोग, शुक्र संबंधी रोग, रक्तपित्त अशा अनेक व्याधी विरेचन उत्तम उपाय आहे.

वमनाप्रमाणे विरेचनाचे 3 टप्पे आहेत.

  • पूर्वकर्म
  • प्रधानकर्म
  • पश्चातकर्म

पूर्वकर्मात शरीराला विरेचनाकरीता तयार करणे हा मुख्य भाग असतो. त्याकरीता स्नेहपान ( औषधीसिद्ध तूप पिणे) स्नेहन ( मालीश) स्वेदन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पथ्यकर आहार विहार पालन करणे. पूर्वकर्म जेवढे चांगल्या पद्धतीने रुग्ण पालन करतो तेवढ्या चांगल्या प्रकारे विरेचन कर्म पार पडते. या स्नेहपान काळाला साधारण ६ ते ७ दिवस लागतात.

प्रधान कर्म – पूर्वकर्म पूर्ण झाल्यावर मुख्य विरेचन कर्म केले जाते. विरेचन करणारी औषधी काढा किंवा चाटण स्वरूपात दिल्यानंतर जुलाब होतात. हा अतिसार व्याधी नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे. यात दोषांचे निर्हरण मलावाटे होत असते. त्यामुळे इतके मलप्रवर्तन होऊनही यात अशक्तपणा येत नाही. उलट हलकेपणा जाणवतो. प्रसन्नता जाणवते, भूक वाढते. एखाद्या व्याधीसाठी विरेचन होत असेल तर व्याधी कमी होते. विरेचन कर्म १ दिवसातच पूर्ण होते.

पश्चात कर्म- यात हळूहळू पातळ आहार सुरु करून ३-४ दिवसात सामान्य आहारावर आणले जाते.

विरेचन पंचकर्म वैद्याच्या सल्ल्यानेच करावे.

शरद ऋतु ( अश्विन कार्तिक मास) सुरु होतोय त्यामुळे या स्वास्थ्य टिकविण्याकरीता विरेचन पंचकर्म नक्की करावे. दिवाळी आली की जशी घराची स्वच्छता करतो घरातील उपयोगी नसलेला कचरा जसा बाहेर टाकल्या जातो तसेच विरेचन पंचकर्माव्दारे शरीरातील दोष बाहेर काढूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER