फडणविसांचे लाडके अधिकारी टेन्शनमध्ये

badgeराज्यातील भाजपच्या राजवटीला ‘पेशवाई’ म्हणून काँग्रेसवाल्यांकडून हिणवले जात असे. ही भावना एवढी तीव्र होती की, ‘पुणेरी पगडी’ही शरद पवारांना नावडती झाली होती. छगन भुजबळ यांचा सत्कार ‘जोतिबा पगडी’ घालून त्यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आता गेले. सत्तांतरानंतर देवेंद्र सरकारच्या साऱ्या गोष्टी बदलण्याचा सपाटा उद्धव सरकारने लावला आहे. सुरळीत कारभारासाठी गरज वाटल्यास अधिकारी बदला असा गुरूमंत्र ह्या सरकारचे सूत्रधार शरद पवार यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. देवेंद्र यांच्या खास मर्जीतील अधिकाऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे. बदलीत आपल्याला कुठे फेकले जाईल ह्या काळजीने अनेक अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

सत्तातरानंतर प्रशासनातही बदल होतात. आपल्या मर्जीतले अधिकारी आणले जातात. लोकही तशी मागणी करीत आहेत. माजी आमदार आशिष देशमुख यांनी तर संघ विचाराचे कुलगुरू बदलण्याची मागणी करून शिक्षण वर्तुळात खळबळ उडवली आहे. उद्धव सरकारही ‘सफाई’ करीत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर प्रशासनात अनेक चेहरे पहायला मिळतील. पोलीस दलातही मोठा फेरबदल होऊ घातला आहे.

फडणवीसांची चांगली कामे पुसून टाकण्याचा ठाकरेंचा अट्टाहास – माजी मंत्री बोंडे

शासनाचे मुख्य सचिव अजय मेहता यांना दिलेली सहा महिन्याची मुदतवाढ येत्या मार्चमध्ये संपत आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे लाडके अधिकारी सीताराम कुंटे यांना आणले जाईल अशी जोरात चर्चा आहे. मुंबई महापालिकेत तर शिवसेनेचा जीव अडकलेला असतो. ह्या महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली जाईल. प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आदी अधिकारी हे देवेंद्र यांच्या खास मर्जीतले मानले जातात. त्या सर्वांना बदलले जाईल. मनुकुमार श्रीवास्तव, संजय कुमार ह्या बड्या अधिकाऱ्यांची एका जागी तीन वर्षे झालेली असल्याने त्यांच्यावरही गदा येऊ शकते.

कुठलाही बदल म्हटला की उलटसुलट प्रतिक्रिया येणारच. बदल झाला पाहिजे. पण त्यातून प्रशासन अधिक लोकाभिमुख कसे होईल हे पाहिले पाहिजे. उद्धव सरकारने पारदर्शकतेवर भर दिला आहे. प्रशासनातही पारदर्शक अधिकारी आले तर सामान्य माणूस स्वागतच करील.