पालीचा श्री बल्लाळेश्वर

palicha ballaleshvar

पालीचा श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती. श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री बल्लाळेश्वराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. श्री बल्लाळेश्वराचे श्रद्धास्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे. सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. राज्यातील सर्व भावीक श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

ही बातमी पण वाचा महडचा श्री वरदविनायक

प्राचीन काळी सिंधू देशातील कोकण पल्लीर गावात अर्थात आताच्या पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती आणि मुलाचे नाव बल्लाळ. लहान वयातच बल्लाळला गणेशमूर्ती पूजनाची ओढ लागली. तो गणेश चिंतनात रमू लागला. त्याच्या या गणेशभक्तीने त्याचे मित्रही गणेशाची भक्ती करु लागले. बल्लाळच्या सोबतीने मुले बिघडली अशी ओरड त्यांचे आई-वडील करु लगाले. गावक-यांनी बल्लाळची तक्रार कल्याणशेठकडे केली. पोर भक्तीमार्गाला लागल्याचा त्यांना भलता राग आला. बल्लाळ ज्या रानात गणेशमूर्तीची पूजा करीत असे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी बल्लाळला गणेशभक्तीत रंगून गेलेले पाहिले. त्यांचा पारा चढला. कल्याणशेठने गणेशमूर्ती फेकून देत पूजा मोडून टाकली आणि बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. त्याच अवस्थेत त्याला झाडाला बांधून ठेवले. बल्लाळ शुद्धीवर आल्यावर त्याने पुन्हा गणेशाचा धावा केला. बल्लाळचा धावा ऐकून विनायक तिथे अवतरले. त्यांनी त्याला बंधमुक्त केले. ते बल्लाळला म्हणाले, ‘तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य आणि दीर्घायुषी होशील.  आता तुला हवा तो वर माग.’ तेव्हा बल्लाळ म्हणाला, ‘तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्या.’ तेव्हा गणेशाने त्याची इच्छा पूर्ण करत तिथेच ”बल्लाळ विनायक” नावाने वास्तव्य केले.

palicha ganpati‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.’ असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिलेत अंतर्धान पावले. तीच शिला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराच्या गाभार्‍यात तीन फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. मूर्तीचे डोळे हिर्‍याचे आहेत. मागील प्रभावळ चांदीची असून, त्यावर ऋद्धिसिद्धि चव-या हलवीत उभ्या आहेत. सूर्य उगवतो तेव्हा सूर्याचे किरण मूर्ती्च्या अंगावर पडतात. एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखे या मंदिराचे बांधकाम आहे. गाभारा 15 फूट उंच आहे. बाहेरचा उंदराचा गाभारा 12 फूट उंच आहे. सभामंडप 40 फुट लांब व 20 फूट रुंद आहे. त्यात सुंदर कमानी आहेत. आवारात एक प्रचंड घंटा आहे. ती नाशिकच्या नारोशंकरी घंटेची आठवण करुन देते. ती श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी दिलेली आहे.

मंदिराच्या मागे श्री धुंडिविनायकाचे मंदिर आहे. बल्लाळच्या वडिलांनी फेकून दिलेली गणेशाची मूर्ती म्हणजे हीच धुंडिविनायक अशी आख्यायिका आहे. बल्लाळेश्वराच्या पूजेआधी धुंडिविनायकाचा मान आहे. बल्लाळेश्वराचे मंदिर प्रारंभी लाकडी होते. त्याचे पाषाणी बांधकाम नाना फडणविसांचे भाऊ मोरोबादादा फडणवीस व त्यांचे वडील बाबूराव बाबा फडणवीस यांनी केले. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन उत्सव येथे होतात. हे जागृत स्थान असल्याने मोठ्या संख्येन भक्त येतात. श्री बल्लाळेश्वर पालीला कसे पोहोचाल. श्रीबल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कर्जत रेल्वेस्टेशनच्या नैऋत्येस साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 110  किलो मीटरवर पाली आहे.

ही बातमी पण वाचा : दर्शन मोरगावंच्या बाप्पांचे