पाकिस्तानचा वृथा अभिमान

Pulwama Attack

पुलवामा तळावरील हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजे २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने सीमा ओलांडून बालाकोट या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली चालणाऱ्या जैश-ए-मुहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यावर बाँम्ब वर्षाव करून शेकडो कट्टर दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. पुलवामावरील भ्याड हल्ल्याचा हा जसा बदला होता तसा पाकिस्तान पुरस्कृत आगामी कारवाईचा नायनाट होता हे स्पष्ट झाले. भारतीय लष्कराच्या या शौर्य कामगिरीबद्दल देशाने स्तुतीसुमने उधळली पण काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी, नक्की किती दहशतवादी मारले गेले याचे आकडे मागीत व नतद्रष्टपणा दाखवित पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळला हे जनता जाणते. त्याचा विसर पडलेला नाही. पाकिस्तानने प्रारंभी असा हल्ला झालाच नाही असा दावा केला व नंतर भारतीय हल्ल्यात फारसे नुकसान झाले नाही असा पवित्रा घेतला. काही काळानंतर विदेशी पत्रकारांनी प्रत्यक्ष माहिती घेऊन बालाकोट हल्ल्यात १५०-२०० दहशतवादी मारले गेले असे वार्तांकन केले तेव्हा काँग्रेस व अन्य विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे झालेत हा अलीकडला इतिहास आहे.

ही बातमी पण वाचा : मुस्लिम आरक्षणाचा अद्याप निर्णय नाही : एकनाथ शिंदे

तो आठवण्याची कारणे दोन. ती म्हणजे बालाकोट हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय हवाई दलप्रमुख आर. के भदुरिया यांनी देशाच्या हवाई सामर्थ्याबद्दल जनतेला आश्वस्त करणे आणि पाकिस्तानी हवाई दलाने पुनश्च दर्पोक्ति करणे. पाकचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या काळात त्यांच्या देशाची भूमी दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी वापरू दिली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. पाकच्या इतर नेत्यांप्रमाणेच ते खोटे होते हे सांगायला नकोच. कारण अशी कितीही आश्वासने त्यांनी दिली तरी गेली ७०-७२ वर्षे दहशतवादी कारावाया चालूच राहिल्या. त्या पाक पुरस्कृतच होत्या हे उघड आहे. जम्मू-काश्मिरात दर पंधरा दिवसांनी पोलिस व लष्करावर हल्ले तसेच भारताच्या विविध राज्यांत बाँम्बस्फोट घडवून आणायचे ही पाकिस्तानचीच चाल होती. पाकचे लष्कर व आय.एस.आय़. ही बदनाम गुप्तचर यंत्रणा त्यामागे सतत राहिली. यापुढे असली थेरं चालणार नाहीत, कारण आताचे सरकार कडक धोरण अवलंबणारे आहे असा, बालाकोटवर थेट हल्ला करून भारताने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. लातो के भूत बातोंसे नही मानते या सिद्ध अनुभवाने भारताने ही धाडसी कारवाई चतुराईने पार पाडली.

गेल्या चार दशकातील ही कारवाई सर्वाधिक उल्लेखनीय आहे असा पुनरुच्चार करीत भारतीय हवाई दलप्रमुख भदुरिया यांनी पाकिस्तानातील इतरही दहशतवादी अड्ड्यांवर भारताचे लक्ष असून हल्ले परतावून लावण्यास दल सज्ज असल्याचा निर्वाळा दिला.

पाकिस्तान कितीही नाकारित असला तरी बालाकोट कारवाईत त्य़ांचे हात किती पोळले याची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचे भदुरिया यांनी स्पष्ट केले आहे. पण पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख मुजाहिद अन्वर यांनी आपले तुणतुणे थांबवले नाही. भारताच्या हल्ल्यात काहीही नुकसान झाले नाही उलट पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पिटाळून लावले असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या पोकळ दाव्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसेच विरोधक
म्हणतात म्हणून भारतीय सैनिकांच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही कारण पाकिस्तान आपले नुकसान झाले किंवा आपली हार झाली हे सत्य कधीच स्वीकारीत नाही. १९६५ व १९७१च्या युध्दात त्यांचा पराभव झाला हे जगाने

मान्य केले परंतु पाकिस्तान अद्यापही ते मान्य करीत नाही. तो त्याचा स्वभाव नाही. पाक राज्यकर्ते आणि तेथील लष्कर जनतेला सत्य कधीच सांगत नाहीत. जनतेला कायम संभ्रमात ठेवून ते सत्ता ताब्यात ठेवतात हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. लोकांना गाफिल ठेवून आपण जनतेशीच नव्हे तर स्वतःशीदेखील प्रतारणा करतो हे त्यांच्या गावीही नाही. ‘क्रोधे अपमाने कुबुध्दी, आपणास आपण वधी’ असे त्यांचे आचरण राहात आले आहे. पाक हवाई दल प्रमुखांची ताजी दर्पोक्ति त्याच पठडीतली आहे.

चंद्रशेखर जोशी