शोएब अख्तर पडला तोंडघशी, सातवा पाकिस्तानी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटीव्ह

शोएब अख्तर

सध्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेट (Cricket) संघातील खेळाडू कोरानासंदर्भात (Corona) खबरदारी पाळत नसल्याने पाकिस्तानी संघाला मायदेशी परत पाठवून देण्याचा इशारा न्यूझीलंडने दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने पाकिस्तानी जलद गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) तीळपापड झाला असला तरी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा सातवा सदस्य आता कोरोना पाॕझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे शोएब अख्तर चांगलाच तोंडघशी पडला आहे.

पाकिस्तानी संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी तिकडे दाखल झालेला पाकिस्तानी संघ आयसोलेशनमध्ये असला तरी त्यांचे खेळाडू ख्राईस्टचर्चमधील हाॕटेलात सोबतच घोळक्याने फिरताना आणि भोजनातही देवाण घेवाण करताना दिसत आहेत. याबद्दल त्यांना न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने इशाराही दिला आहे. यामुळे त्यांना तीन दिवसानंतर एकत्र सराव करायाची आधी देण्यात आलेली परवानगीही आता नाकारण्यात आली आहे.

पाकिस्तानी संघाला आयसोलेशनमध्ये तीनच दिवस झाले असले तरी त्यांचे सात खेळाडू कोरोना पाॕझिटिव्ह आढळून आले आहेत. 53 सदस्यांचे पाकिस्तानी पथक मंगळवारीच न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहे. न्यूझीलंडमधील नियमानुसार आयसोलेशनमधीला व्यक्तींची तिसऱ्या आणि 12 व्या दिवशी चाचणी करण्यात येते. आता यात जे सात पाकिस्तानी खेळाडू पाॕझिटिव्ह आढळले आहेत त्यांचा आयसोलेशन कालावधी 14 दिवसापेक्षा अधिक असू शकतो.

पाकिस्तानी संघाने नियमांचे असे उल्लंघन सुरुच ठेवले तर त्यांना न्यूझीलंडमधून परत पाठवले जाऊ शकते असा इशारा न्यूझीलंड आरोग्य सरसंचालक डॉ. अॕशली ब्रुमफिल्ड यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की पहिले तीन दिवस त्यांनी हाॕटेलातील आपआपल्या खोलीतच राहणे अपेक्षित असताना ते मास्क न लावता एकमेकांशी मिसळत गप्पागोष्टी करताना आणि अन्नही वाटून खाताना दृष्टीस पडले आहेत. मात्र या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या वागण्यात सुधारणा दिसून आली आहे.

मात्र त्याआधी पाकिस्तानी संघाने निर्बंधाचे पालन केले नाही तर त्यांना मायदेशी परत पाठवण्यात येईल या न्यूझीलंड क्रिकेटच्या इशाऱ्याने पाकिस्तानी जलद गोलंदाज शोएब आख्तरचा तीव्र संताप झाला होता आणि त्याने न्यूझीलंड मंडळाने जरा व्यवस्थित बोलायला शिकावे अशी आगपाखड केली होती. हा काही क्लबचा संघ नाही तर पाकिस्तानचा राष्ट्रीय संघ आहे याचे त्यांनी भान राखायला हवे असे मत त्याने व्यक्त केले होते. भूतलावरील सर्वोत्तम देशाबद्दल बोलत आहोत हे न्यूझीलंडने लक्षात ठेवावे अशी दर्पोक्ती त्याने केली होती. आपल्या यु ट्युब चॕनेलवर त्याने या दर्पोक्तीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंड सामने खेळावेत ही त्यांची इच्छा होती, आमची नाही, आम्हाला तुमची गरज नाही आणि आमच्या खेळण्याने प्रक्षेपण हक्कातून तुमचाच फायदाच होणार आहे, त्यामुळे उलट न्यूझीलंडने आमचे ऋणी असायाला हवे की कोरोना काळातही आम्ही तिकडे खेळण्यासाठी आलोय. आता पाकिस्तानी संघाने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी असेही त्याने म्हटले आहे. पाकिस्तानी मंडळाने यावर आपली नाराजी स्पष्ट करायला हवी अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. मी असतो,तर त्यांना चोख उत्तर दिले,असते आणि मी स्वतः त्यांना सांगितले आसते की आम्हालाच तुमच्याशी खेळायची इच्छा नाही आणि पुढील पाच वर्षे तरी आम्ही न्यूझीलंडमध्ये येऊन खेळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER