या पाकिस्तानी जलद गोलंदाजाने हेल्मेटचे केले चक्क दोन तुकडे!

Arshad Iqbal - Tinashe Kamunhukamwe

क्रिकेटमध्ये वेगवान चेंडूपायी बॅट तुटल्याचे, स्टम्प तुटल्याचे, फलंदाज जायबंदी झाल्याचे किंवा त्याच्या हेल्मेटची जाळी तुटल्याचे आपण पाहिले आहे. पण एखाद्या वेगवान चेंडूने फलंदाजाच्या हेल्मेटचे चक्क दोन भाग केल्याचे आपण आजपर्यंत पाहिले नव्हते; पण हे अघटित पाकिस्तान (Pakistan) आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या (Zimbabwe) दुसऱ्या टी-२० सामन्यात (T20) शुक्रवारी हरारे (Harare) येथे घडले.

या सामन्यात पाकिस्तानला ११९ धावाच करायच्या असतानाही फक्त ९९ धावांतच बाद झाल्याने लाजिरवाणा पराभव झाला; पण त्यात पाकिस्तानी जलद गोलंदाज अर्शद इकबालने (Arshad Iqbal) आपल्या बाउन्सरवर झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कामुन्हुकामवेच्या (Tinashe Kamunhukamwe) हेल्मेटचे थेट दोन भाग केल्याचे थरारक दृश्य बघायला मिळाले. सुदैवाने तिनाशे सहीसलामत राहिला.

ज्यावेळी अर्शदचा बाउन्सर आदळला आणि हेल्मेटचे दोन भाग होऊन पडले त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंचा थरकाप झाला आणि काही अनर्थ तर झाला नसेल या भीतीने ते त्वरित मदतीला धावले.

अर्शद आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता आणि त्याने टाकलेला बाउन्सर कामुन्हुकामवे याने पूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फसला आणि चेंडू थेट हेल्मेटवर जाऊन जोरात आदळला आणि त्या जबदरस्त प्रहाराने त्याच्या हेल्मेटचे चक्क दोन भाग झालेले बघायला मिळाले. बाहेरची कॅप वेगळी होऊन पडली आणि आतील संरक्षक आवरण तसेच राहिले.

या प्रहाराने तिनाशे काहीसा भांबावला; पण सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. मैदानातील पंच व पाकिस्तानी क्षेत्ररक्षक तातडीने त्याच्या मदतीला धावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button