पाकिस्तान आम्हाला जनावरांप्रमाणे वागवतो – सज्जाद राजा

मानवाधिकार परिषदेत अत्याचारांची माहिती देताना फुटला अश्रूंचा बांध

Sajjad Raja

जिनेव्हा : पाकिस्तान पीओकेमधील ( पाकिस्तानव्याप्त काश्मीर ) नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देतो, अशी माहिती पीओकेचे कार्यकर्ते सज्जाद राजा यांनी गुरुवारी जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत दिली. पीओकेमध्ये पाकिस्तान करत असलेल्या अत्याचारांची माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले. “आझाद काश्मीर निवडणूक कायद्याने पीओकेमधील नागरिकांचे सर्व घटनात्मक, नागरी आणि राजकीय हक्क हिरावून घेतले आहेत.

आम्ही पीओकेमधील नागरिक परिषदेकडे विनंती करतो की, आम्हाला जनावरांसारखी वागणूक देण्यापासून पाकिस्तानला रोखा. निवडणूक कायद्याने आमचे हक्क हिरावले आहेत.” असे सज्जाद राजा म्हणाले. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतो. त्यासाठी आमच्या घरात आम्हाला देशद्रोही घोषित केले आहे. आमच्या राजकीय उपक्रमांना अनधिकृत घोषित केले जात आहे. त्यामुळे लष्कराला आमच्या लोकांची हत्या करण्याची मोकळीक मिळते आहे.

पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये सीमेच्या दोन्ही बाजूंकडील तरुणांची माथी भडकावण्याचे काम करतो आहे. त्यांना भारतासोबत लढण्यासाठी तयार केले जात आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान पीओकेमधील दहशतवाद्यांना आश्रय देत असून तिथून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरू आहेत, अशी माहिती सज्जाद राजा यांनी दिली. पाकिस्तानने आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमचा आवाज ऐकला जाईल असा विश्वास आहे. आमच्यावर जे अत्याचार सुरू आहेत ते शांतताप्रिय जगाने थांबवावे, अशी विनंती सज्जाद राजा यांनी केली. यावेळी सज्जाद राजा यांचा गळा दाटून आला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER