पाकिस्तानचा बांगलादेशवर ९४ धावांनी विजय

pakistan team

लॉर्ड्स  : आयसीसी वर्ल्ड कप-२०१९ भारताने इंग्लडकडून पराभूत होत पाकिस्तानला स्पर्धेबाहेर केले होते. मात्र आज औपचारिक सामना बांगलादेश सोबत खेळला गेला. वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर ९४ धावांनी विजय मिळवला.

शाहिन आफ्रिदीने ३५ धावांत ६ विकेट घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २२१ धावांत तंबूत परतला.

ही बातमी पण वाचा : पडत्या काळातील मदतीची कृत्यज्ञता म्हणून धोनी बदलतो बॅट!

फाखर जमान (१३) स्वस्तात माघारी परतल्यानंतर इमाम उल हक व बाबर आझम यांनी १५७ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. जावेद मियादाँद यांचा १९९२ च्या वर्ल्ड कपमधील ४३७ धावांचा विक्रम त्याने मोडला.

मात्र, त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्यानं ९८ चेंडूंत ९६ धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ४७४ धावा केल्या आहेत. इमामने शतकी खेळी केली. पण, पाकिस्तानच्या धावांचा वेग हा अपेक्षेपेक्षा कमी होता. मधल्या व तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानं पाकिस्तानला ५० षटकांत ९ बाद ३१५ धावा करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ ४४.१ षटकांत २२१ धावांत तंबूत परतला. शाकिब अल हसन (६४) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. वर्ल्ड कप स्पर्धेत सलग ८ सामन्यांत ४०+ धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.आता या सामन्यानंतर पाकिस्तन स्पर्धेबाहेर होणार आहे. मात्र त्यांनी विजयी उत्सव साजरा केला.

ही बातमी पण वाचा : उपांत्य फेरीत भारत कुणाशी खेळणार?