पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची भारतीय अधिकाऱ्यांना दिली परवानगी

Kulbhushan Jadhav

दिल्ली :- हेरगिरीच्या खोट्या आरोपात पाकिस्तानच्या कारागृहात असलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.

दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी सुद्धा पाकिस्तानने मान्य केली आहे. जाधव यांच्याबाबत फेरविचार याचिका इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये दाखल करण्याची अंतिम तारीख २० जुलै आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते.

आयसीजेच्या निकालानुसार, ‘काऊंन्सलर अ‍ॅक्सेस’ तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची आठवण भारताने (India) पाकिस्तानला करून दिली आहे. मागच्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानने दिली होती. भारताने याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्तानने (Pakistan) कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडले, असा आरोप केला आहे.

“कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER