माझ्या आदेशानेच पाडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse

जळगाव : पक्षासोबत नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी आमदार उदयसिंह पाडवी (Uday Singh Padvi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा दावा खडसे यांनी केला आहे.

माझ्या सल्ल्यानुसार पाडवींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे सत्य आहे. उदयसिंह पाडवी यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश करु याबाबत विचारणा केली होती. त्यावर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असा सल्ला मी त्यांना दिला, असं एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. तसंच अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला आहे.

खानदेशातील अनेक नेते आमदार आपल्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत का?, या प्रश्नावर ‘मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर मी त्यांच्या प्रवेशावर काय बोलू’, असं खडसे म्हणाले. तसंच मी आणखी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, असंही सांगायला खडसे विसरले नाही.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने आणि खडसेंनी देखील त्याला दुजोरा दिल्याने खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पक्षसंघटन आणखी मजबूत करण्यासाठी करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिले आहे.

ही बातमी पण वाचा : तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER