प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय सर्वस्वी साईनाचाच होता : पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे स्पष्टीकरण

Saina Nehwal
  • पी.गोपीचंद यांच्या आरोपांना दिले उत्तर
  • विमलकुमार यांनी साईनाला घसरणीच्या काळात सावरले
  • गोपीचंद यांच्या योगदानाचीही वेळोवेळी दखल घेतल्याचा दावा

ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिचा गोपीचंद अकादमी सोडून प्रशिक्षणासाठी प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीकडे (पीपीबीए) जाण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा होता. त्यात आमची कोणतीही भूमिका नव्हती असे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीने स्पष्ट केले आहे. साईना नेहवालला गोपीचंद अकादमी सोडून जाण्यासाठी काही लोकांनी प्रवृत्त केले होते आणि ती त्यांच्या प्रभावाखाली आलेली होती असा आरोप बॅडमिंटनचे राष्टÑीय प्रशिक्षक पी.गोपीचंद यांनी लवकरच आपल्या येऊ घातलेल्या पुस्तकात केला आहे.

त्याचे खंडन करणारे स्पष्टीकरण देताना पीपीबीए’ने म्हटलेय की, गोपीचंद यांनी स्वत: पदुकोण यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे आणि रिओ २०१६ ऑलिम्पिक आधी साईनाचा विमलकुमार यांच्याकडून प्रशिक्षणासाठी हैदराबादहून बंगलोरला येण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा होता. गोपीचंद यांनी आरोप केला आहे की ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट योजनेचे अधिकारी विरेन रासकिन्हा यांच्यासह प्रकाश पदुकोण व विमलकुमार यांनी साईनाला हैदराबाद सोडण्यास प्रोत्साहीत केले आणि ते तिला या निर्णयापासून परावृत्त करू शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही.

या आरोपांचे खंडन करतानाच पीपीबीए’ने दावा केला आहे की साईनाची कामगिरी खराब होत होती त्यावेळी विमलकुमार यांनीच तिला नंबर वन स्थानी पोहचण्यासाठी आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप व वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक जिंकण्यास मदत केली.

प्रकाश पदुकोण आपल्याबद्दल कधीच चांगले बोलत नाहीत या आरोपाचेही पीपीबीए’ने उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की भारतीय बॅडमिंटनमध्ये गोपीचंद यांच्या खेळाडू व प्रशिक्षक म्हणून गोपीचंद यांच्या योगदानाचा पीपीबीएचा आदरच आहे. आम्हीसुद्धा वेळोवेळी त्यांच्या शिष्यांच्या यशावेळी ते मान्यच केले आहे आणि आम्ही नेहमीच त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. गोपीचंद हे स्वत:सुद्धा पदुकोण यांच्याकडून प्रशिक्षीत आहे. त्यांनतर ते प्रशिक्षणासाठी गांगुली प्रसाद यांच्याकडे गेले होते.

पीपीबीए गेल्या २५ वर्षांपासून खेळाडू घडविण्याचे काम करतेय आणि खेळाडूंच्या हितासाठीच काम करतेय. त्यांच्या प्रगती कुठेही खुंटू नये हाच आमचा प्रयत्न असतो आणि तेच आमचे धोरण आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची कारकिर्द फारच कमी काळाची असते त्यामुळे त्यात आपल्या हिताचे काय याचा निर्णय ते खेळाडूच घेत असतात असे पीपीबीए’ने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.