धान उत्पादकांना मिळणार क्विंटलला ७०० रुपये मदत

- सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Crop

मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल ७०० रुपये देण्याच्या निर्णय (Paddy Procurement Incentive Support) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (important decision state ministry) मंगळवारी घेण्यात आला. २७ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केंद्रे सरु करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय असे विविध निर्णयही घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या निर्णयांमुळे राज्य सरकारला १४०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येईल. (Three important decision of Maharashtra Cabinet) खरीप हंगाम २०२० – २०२१ साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत १८६८ रुपये ठरवली होती. ग्रेड धानासाठी ती १८८८ रुपये निश्चित करण्यात आली. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर मदत देण्याचा विचार राज्य सरकार करत होते. धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे प्रोत्साहनपर ७०० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. या वर्षी १ कोटी ७८ लाख क्विंटल धान खरेदी होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवार (२७ नोव्हेंबर) पासून १६ कापूस उत्पादक जिल्ह्यातील २१ केंद्रांमध्ये तसेच ३३ जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा ३ जिल्ह्यांत एकूण ९ कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवडयामध्ये सुरु होणार आहेत.

सिंधुदूर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सिंधुदुर्ग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणखी ५०० रुग्णांवर उपचार होईल, असे रुग्णालय संलग्न करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२१-२२- मध्ये सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या अनुषंगाने ३० नोव्हेंबर २०२० पूर्वी केंद्र शासन तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी एकूण रुपये ९६६. ०८ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER