पडळकर बनले आंदोलनाचा चेहरा; आघाडीतील बिघाडी पुन्हा आलीये का समोर?

Gopichand Padalkar - Maharastra Today

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्रोश समोर महाविकास आघाडी सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. १४ मार्च रोजी होणारी परिक्षा आता २१ मार्चला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पण या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या आंदोलनाचे काय पडसाद उमटले? महाविकास आघाडीतील असमन्वय समोर आलाय का? यामुळं प्रशासन आणि सरकार यांच्यातील असंवाद समोर आलाय का? या प्रकरणाचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध आहे का? महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी आहे का? असे अनेक प्रश्न सामान्य जनता, विद्यार्थी, पालक यांच्या मनात निर्माण झाली असतील.

कसा होता घटनाक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अचानक परित्रक काढलं.. आणि ऐन तोंडावर आलेली परिक्षा रद्द झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दबलेल्या आक्रोशाचा स्फोट झाला. पाहता पाहता काही मिनिटातच विद्यार्थी पुण्यातील नवीपेठ येथी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लायब्ररी जमयाला सुरूवात झाली. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.. प्रशासनाचा अक्षरश: गोंधळ उडाला एवढी संतापाची लाट या विद्यार्थ्यांमध्ये होती. पण एवढे विद्यार्थी आक्रमक का झाले? या स्वाभाविक प्रश्नाला उत्तरही तसेच आहे. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रलोकसेवा आयोगानं कोणतीही मोठी भरती केली नाही. मागील सरकारनं घेतलेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे निकाल लागले, परंतु त्यांच्या नियुक्त्या रखडल्या. असे आरोप विद्यार्थी करत होते. तर आत्ता १४ मार्च होणारी परिक्षाही पुढं ढकलल्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत येऊन धडकला म्हणून विद्यार्थी सैरभैर झाले होते.असे अनेक संतप्त प्रतिक्रीया विद्यार्थ्यांमधून येत होत्या.

आंदोलनाचा चेहरा आमदार गोपीचंद पडळकर

दुपारी दोनच्या सुमारास राज्यसेवा परिक्षा पुढं ढकलल्याचा निकाल आला. अहिल्या शिक्षण मंडळासमोर मोठ्यासंख्येनं विद्यार्थी जमले. चौथ्यांदा ही परिक्षा पुढं ढकलली गेल्यामुळं विद्यार्थ्यांच्यात प्रचंड आक्रोश होता. विद्यार्थ्यांच्या या आक्रोशला वाचा फोडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन लावून धरलं. त्यांनी चक्क रस्त्यावर झोपत ठिय्या मांडला. विद्यार्थ्यांच धरणं आंदोलन त्यामुळं आणखीनंच वाढलं. या आक्रोशाला वाचा फोडली आमदार गोपीचंद पडळकरांनी.

आमदार पडळकारांना भेटून विद्यार्थ्यांनी व्यथा सांगितल्या.१४ ला राज्यसेवा आणि पुढच्या महिन्यात ११ तारखेला पुन्हा नोकर भर्तीच्या परिक्षा असल्यामुळं मेस आणि रुम मालकांनी अगाऊ भाडं भरुन घेतलं. परिक्षा जर अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या तर मोठं नुकसान होईल, अशी माहित विद्यार्थी देत होते. जोपर्यंत मुख्यमंत्री तारिख जाहीर करत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असं म्हणत आमदार पडळकर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर झोपले.

गरिब विद्यार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रूपये भत्ता द्या

विद्यार्थ्यांची बाजू मांडताना पडळकर आक्रामक झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिस कर्मचारीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. धरणे आंदोलन मागं घ्यायला सांगितलं पण पडळकर हटायला तयार नव्हते. कोरोनाचं कारण देत जर सरकार परिक्षा घेणार नसेल तर विद्यार्थी पीपीई किट घालून परिक्षेला बसतील, तुम्ही परिक्षा घ्या, असं आवाहन ते राज्य सरकारला करत होते. तसेच आंदोलन निवळ्यानंतर पडळकरांनी पत्रकार परिषद घेत, हे सरकार विश्वासघातकी आहे, मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे?, प्रशासन व राज्यसरकार यांमध्ये नसलेला समन्वय यावर जोरदार टिका केली. सोबतच जे गरिब विद्यार्थी परिक्षेसाठी शहरांमध्ये आलेत त्यांना सात दिवसांचा प्रत्येकी वीस हजार रूपये भत्ता द्या. अशीही मागणी पडळकरांनी केली.

मराठा आरक्षण आणि भरती

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्य सरकार आधीच अडचणींचा सामना करत आहे. मराठा विद्यार्थ्यांमध्ये रोष आहेच. शिवाय ओबीसी आणि एस.सी.एसटी विद्यार्थ्यांमधूनही नाराजीचा सूर उमटतोय. एसीबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर त्यातून अनेक जणांनी अर्ज केले. एका भरती प्रक्रीयेचा निकाल आला. परंतु आरक्षणाच्या तांत्रिक बाबींचं कारण देत राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याच थांबवल्या असल्याचं, विद्यार्थ्यांचा म्हणनं आहे. जर फक्त मराठा आरक्षण आणि एसीबीसीचा प्रश्न असेल तर इतर विद्यार्थ्यांना त्याचा त्रास का? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत होते.

मराठा आरक्षणाच्या सुनावणीची तारिख लक्षात घेऊन परिक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला का? असा प्रश्न ओबीसी विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय. ८ मार्च ते १८ मार्चेला सर्वोच्च न्यायालायत मराठा आरक्षणावर सुनावणी होतीये. या सुनावणीनंतर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत स्पष्टता येईल मग कोटा ठरवताना मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा सरकारचा समज असल्यानं दिरंगाई होतीये का? असा सवाल समाज माध्यमांमध्ये उपस्थीत केला जातोय.

दरम्यान मराठा आरक्षणाचा विषय हा काही दोन महिन्यात सुटणारा विषय नाही. जोवर मराठा आरक्षणाचा निकाल येत नाही तोवर परिक्षाच घेणार नाही, असा महाविकास आघाडीचा विचार आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवला.

आघाडीत बिघाडी? आणि मुख्यमंत्र्यांची सारवासारव

राज्यसेवा आयोग हा वडेट्टीवारांच्या नियंत्रणाखाली येतो. त्यांनी मात्र या प्रकणावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले, “माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल,” . यामुळं सोशल मिडीयावर वडेट्टीवारांवर टिकेची झोड उठली होती. नंतर वडेट्टीवारांनी यावर सारवा सारव केली.

दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटलांनी सरकार गोंधळल्याचं सांगत, ठाकरे सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचं खरं कारण आधी सांगावं. सरकारला कोरोनाची भीती असेल तर मग त्यांना बाकीचे कार्यक्रम आणि बाकीच्या परीक्षा कशा चालतात ? हे सरकार प्रचंड गोंधळलेलं आहे !” अशी प्रतिक्रिया दिली.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या भीषण परिस्थीतीबद्दल माहिती देत आम्ही परिक्षेची तारीख एका आठवड्यात जाहीर करु असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि नंतर २१ तारिख जाहीर झाली.

दरम्यान मात्र विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या घेरण्याचा प्रयत्न केला. परिक्षा पुढं ढकलू नयेत त्या वेळेत व्हाव्यात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवारांनी दिली, काँग्रसचे सत्यजीत तांबेनीही परिक्षा पुढं ढकलू नयेत असं सांगितलं. तर काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी मला विश्वासात न घेता परस्पर निर्णय झाल्याचं बोलून दाखवलं. त्यामुळं आघाडीत समन्वय नसल्याची बाब परत एकदा समोर आली, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायेत.

एकंदरीत मराठा आरक्षण, भरती प्रक्रीया, वारंवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढं ढकलणे यामुळे सर्वच विद्यार्थी,परिक्षार्थी, आगामी परिक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी, पालक, मेसचालक, हॉस्टेल चालक, याविद्यार्थ्यांवर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यावसायिक सर्वांच्याच मनात एक अस्वस्थता निर्माण झालीये.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER