ओवेसी, वारिस पठाण यांची प्रक्षोभक भाषणे; उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Owaisi - Asaduddin Owaisi - Delhi High Court

नवी दिल्ली : एआएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना नोटीस पाठवली आहे.

दिल्लीतील जाफराबाद आणि मौजपूरमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून प्रचंड हिंसाचार झाला. राजकीय नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे हिंसेचा उद्रेक झाला, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी हिंदू सेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी आणि वारिस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. दुसऱ्या एका वकिलाने सामाजिक कार्यकर्ता हर्ष मंदार, आरजे सायमा, स्वरा भास्कर, आपचे नेते अमानतुल्ला खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने गृह मंत्रालय, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना याबाबत नोटीस बजावली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी महासचिव प्रियंका गांधी, रॉबर्ट वढेरा यांनीही प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भातही न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून केंद्र सरकारला म्हणणं मांडण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.