कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी? ते लवकरच कळेल – शिवसेना

PM Narendra Modi - Asaduddin Owaisi - Uddhav Thackeray

मुंबई : खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएम (MIM) पक्षावर सातत्यानं भाजपाची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असतो. भाजपाविरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या या आरोपाला भाजपा खासदारानं अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपा (BJP) नेतृत्वासह असदुद्दीन ओवेसी यांना खडेबोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्ष इतरांना नैतिकतेचे व हिंदुत्वाचे धडे देत असतो. त्या शुद्ध हिंदुत्वात ओवेसीच्या उंगल्याही बुडत असतात, असा टणत्कार साक्षी महाराजांनी केला आहे. ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे. साक्षी महाराजांनी भंडाफोड केलाच आहे. त्यांनी अनवधानाने सत्य जाहीर केले. सध्याच्या काळात सत्य बोलणे हा गुन्हाच आहे. साक्षी महाराज (Sakshi Maharaj) धाडसाने सत्य बोलले. भाजपचा परवरदिगार भगवंत साक्षी महाराजांना अधिक शक्तिमान करो. शक्तिमान होण्याची मक्तेदारी काय फक्त मियाँ ओवेसींचीच आहे?, असा खोचक प्रश्न शिवसेनेने भाजपला विचारला आहे.

आजचा सामना संपादकीय…

ओवेसी साहेबांची पोलखोल भारतीय जनता पक्षानेच केल्याने काही प्रमाणात दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. ओवेसी मियाँचे ‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्याच, पण भाजपचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून खरे सांगितले आहे की, ‘‘होय, मियाँ ओवेसी हे भाजपचेच पोलिटिकल एजंट असून ओवेसीच्या मदतीनेच आम्ही निवडणुका जिंकत असतो.’’ साक्षी महाराज म्हणतात, ‘ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो!’ साक्षी महाराजांनी भाजपचे अंतरंगच उघडून दाखवले. कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, आडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी आहेत हेच दाखवले आहे. बिहारात ओवेसी यांनी मुस्लिमबहुल सीमांचलात पाच जागा जिंकल्या व किमान 17-18 जागांवर तेजस्वी यादवांचे नुकसान केले. नाहीतर बिहारात राजकीय परिवर्तन नक्कीच झाले असते. मुसलमानांची मते ‘सेक्युलर’छाप राजद, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नयेत, त्यांना ही हुकमी मते मिळू नयेत यासाठी मियाँ ओवेसी यांचा पद्धतशीर वापर केला जातो, असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.

बिहारच्या निकालानंतर हे स्पष्टच झाले. राष्ट्रीय लोकदल, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. मुस्लिम वोट बँक कापून भाजपास फायदा व्हावा यासाठीच मियाँ ओवेसी यांची धडपड असल्याचा आरोप हे लोक करीत होते तोपर्यंत ठीक होते, पण आता भाजपच्या गोटातूनही तेच टोले जाहीरपणे लगावले गेले आहेत. प. बंगालात मियाँ ओवेसी यांनी जे कार्य सुरू केले आहे, त्यामुळे भाजपचे चेहरे आनंदाने फुलू लागले आहेत. ओवेसी यांच्या सहकार्याने भाजपास बंगाल जिंकायचा आहे. म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचा आहे. मियाँ ओवेसी हे एक निष्णात कायदेपंडित आहेत. त्यांचे जे काही राजकारण आहे ते त्यांच्यापाशी. मुसलमानांचा जीवनस्तर सुधारावा, मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनातील अंधार व धर्मांधता दूर व्हावी यासाठी ओवेसींसारख्या विद्वानांनी काम केले तर राष्ट्राचे भले होईल; पण हिंदुस्थानच्या पोटात वाढणाऱया दुसऱया पाकिस्तानला अधिक जहरी धर्मांध बनवून ते राजकारण करीत आहेत. त्यांचे राजकारण हिंदुद्वेषावर आधारित आहे. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मधल्या काळात ज्याप्रकारची जहाल वक्तव्ये केली ती धक्कादायक आहेत.

‘24 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना बाजूला करा, मग बघा काय करून दाखवतो ते.’ अशी बेताल भाषा ओवेसी यांचे बंधू जाहीरपणे करत होते. आता हेच ओवेसी भाजपच्या विजयरथाचे मुख्य चाक बनले आहे. भारतीय जनता पक्षाने ओवेसीसारख्यांची मदत घेऊन फायद्याचे राजकारण करावे, पण मग आम्हीच कसे राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादी आहोत असले ‘टेंभे’ यापुढे मिरवू नयेत. मियाँ ओवेसीचा पक्ष ही आमचीच एक गुप्त शाखा आहे हे त्यांनी मान्य करावे. अशा अनेक गुप्त शाखा त्यांनी राज्याराज्यांत वाढवून आणि पोसून ठेवल्या आहेत. मतविभागणीवर जोर हाच मंत्र आहे व महाराष्ट्रातील पालिका व इतर निवडणुकांतही अशी मतविभागणी करणारी ‘यंत्रे’ निर्माण केली आहेत, अशी खोचक टीकाही शिवसेनेने भाजपवर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER