फ्रेंच ओपनमध्ये टॉप- 100 बाहेरच्या खेळाडूंची विक्रमी आगेकूच

Sebastian Korda - Pedro Martinez

टेनिसमध्ये (Tennis) नव्या दमाचे आणि नव्या पिढीचे खेळाडू समोर येत आहेत. हे गेल्या महिन्यात पार पडलेल्या युएस ओपन (US Open) स्पर्धेतही दिसून आले आणि आता फ्रेंच ओपनमध्येही (French Open) दिसून येत आहे. आता हा कोविड- 19 (Covid- 19) मुळे आघाडीच्या खेळाडूंचा माघारीचा परिणाम असेलही कदाचित, पण त्यामुळे टेनिसमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळाली आहे हे निश्चित. हे पाहता टेनिससाठी कोरोनाची साथ एकप्रकारे इष्टापत्तीच ठरली आहे असे म्हणता येईल.

आता यंदा फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीत जे 32 खेळाडू आपले आव्हान टिकवून आहेत त्यात 9 खेळाडू असे आहेत जे क्रमवारीत पहिल्या शंभरमध्येही नाहीत. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 1994 नंतर आणि फ्रेंच ओपनमध्ये 1985 नंतर प्रथमच असे घडले आहे. या दोन्ही वर्षीसुध्दा असे प्रत्येकी 9 टॉप-100 बाहेरचे खेळाडू तिसऱ्या फेरीत पोहोचले होते.

यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत पोहोचलेले टॉप-10 बाहेरचे जे 9 खेळाडू आहेत त्यात सबॅस्टिअन कोर्डा, पेड्रो मार्टिनेझ पोर्टेरो, केव्हिन अँडरसन, ह्युगो गास्टन, डॅनियल अल्टमेयर, डॅनियल इलाही गालन, नॉरबर्ट गोंबोस, मार्को सेच्चिनाटो, रॉबर्टो कार्बालेस यांचा समावेश आहे. यापैकी ह्युगो गास्टन (239) व सेबॕस्टियन कोर्डा (213) हे तर क्रमवारीत दोनशेच्याही खाली आहेत.

महिला एकेरीत टॉप 100 बाहेरच्या 8 खेळाडू अंतिम आठमध्ये पोहोचल्या आहेत. त्यात युजिनी बुचार्ड, अना कॅरोलिना श्मिदलोव्हा, नादिया पेदोरोस्का, बार्बरा क्रेसिकोव्हा, स्वेताना पिरोन्कोव्हा, मार्टीना ट्रेव्हिसन, आयरिना बारा, क्लारा बरेल यांचा समावेश आहे. याशिवाय बरोब्बर 100 व्या क्रमांकावर असलेली लैला फर्नांडीस हीसुध्दा तिसऱ्या फेरीत पोहोचली आहे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिसऱ्या फेरीत पोहोचलेल्या पुरुष खेळाडूंपैकी पाच खेळाडू इटलीचे आहे. इटालियन खेळाडूंसाठी ग्रँड स्लॅम स्पर्धांतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांच्या खेळाडूंमध्ये मॕटीयो बेरेट्टीनी, सेच्चिनाटो, जॅक सिन्नर, सोनेगो व ट्राव्हाग्लिया यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER