छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पुस्तकाबाबत उद्या पुण्यात भूमिका स्पष्ट करणार : उदयनराजे

मुंबई :- ‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत, असे ट्विट उदयनराजेंनी केले आहे. त्यामुळे, उदयनराजे उद्या नेमके काय बोलणार? संजय राऊत यांना उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची भूमिका काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांना उत्तर दिले. आता, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज माजी खासदार भाजपा नेते उदयनराजे भोसले आपली सडेतोड भूमिका स्पष्ट करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, उदयनराजेंनी दिली ही प्रतिक्रिया

‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ हे भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरले आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्याने सर्वच स्तरांतून भाजपावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर मनसेनेही इशारा दिला आहे. या पुस्तकातील मोदींच्या तुलनेवरून आमदार शिवेंद्रराजे अन् छत्रपती संभाजीराजे यांनीही  भूमिका स्पष्ट केली.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचे मला वाटते. त्यामुळेच पुस्तकाला ‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ नाव दिल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात, असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तक बाजारात आलेले आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी जय भगवान गोयल यांनी दर्शवली आहे.