आमचा नारा ‘सरकार भगाओ’ नसून ‘ सरकार जगाओ : फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी असे आम्हाला अजिबात वाटत नाही

Devendra Fadnavis - Aaditya Thackeray

मुंबई :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी किंवा राज्यात सरकार स्थापन करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन कोरोना विरुद्धची लढाई लढायची आहे. अशा वेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी वा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘आज तक’ वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपकडून ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनात आमचा नारा ‘सरकार भगाओ’ नसून ‘ सरकार जगाओ’ होता, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस सध्या ज्या पद्धतीने वागत आहेत, ते आम्ही कधीही विसरणार नाही – जयंत पाटील

या भाजपच्या आंदोलनावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे नवीन आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीच टिप्पणी करणे योग्य नाही. ते कधी विरोधकांवर टीका करतात. कधी केंद्रावर टीका करतात. आदित्य ठाकरेंना राजकारणाचा कोणताच अनुभव नाही, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खालच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे. मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्यावर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले होते.

तसेच त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये ज्यामध्ये आंदोलन करत असलेल्या लहान मुलांचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, पूर्णपणे लज्जास्पद, सत्तेच्या राजकारणाची लालसा नेत्यांना काय करू शकते, जेव्हा आपल्याला मुलांना सुरक्षित आणि घराच्या आत ठेवण्याची गरज आहे तेव्हा राजकीय निषेधासाठी चेहरा झाकून न घेता, मुलांना उष्णतेत उभे केले आहे. कोरोना को भूल गया, राजकारण प्यारा है, अशी टीका भाजपवर केली होती.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री ठाकरेंनी सरकार नागपूरवरून चालवावे – आशिष देशमुख

दरम्यान फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत कोरोना संकटाच्या  पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली नसल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. धारावी व वरळी भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मुंबईत रुग्णालये, बेड, ॲम्ब्युलन्सचा तुटवडा आहे. कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर मरत आहेत. सरकारने ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. मुंबईत कमी प्रमाणात स्वॅब घेतले जात असल्याचा आरोप करताना मुंबईत दररोज किमान १० हजार स्वॅबची तपासणी होऊ शकते; मात्र प्रत्यक्षात साडेतीन हजार चाचण्याच केल्या जात आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते प्रमाण आणखीच कमी झाले आहे, असे सांगताना चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

पीपीई किटवरूनही फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केले. मुंबईत सुरुवातीपासूनच सरकारने रुग्णालयांमध्ये पीपीई किटचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. सरकारी रुग्णालयात नंतर सेवाभावी संस्थांकडून पीपीई किटचा पुरवठा करण्यात आला. सुरुवातीच्या काळात पीपीई किट न मिळाल्याने कोरोना विरुद्धच्या लढाईत रुग्णसेवेच्या माध्यमातून लढत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका व अन्य स्टाफला कोरोनाची लागण झाली, असे फडणवीस म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER