आमची विचारधारा वेगळी, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही; राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

Jayant Patil

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये जाऊन भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. मात्र या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीनं आतापर्यंत भेट झालीच नसल्याचा दावा केला आहे. आजही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही भेटीच्या वृत्ताला तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे.

आज माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. आमच्या आणि त्यांच्या विचारधारेत फार तफावत आहे. यासाठी पवारसाहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. या चर्चांमध्ये काहीही अर्थ नाही. साखर उद्योगातील कॉन्फरन्ससाठी ते अहमदाबादला गेले होते. अशा बातम्या उठवण्याचं काम भाजप सतत करत आहे. आमची आघाडी तोडण्यासाठी भाजप हे करत आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. ते म्हणाले की, भाजपला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे.

केंद्राच्या व्याजदर कपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेतल्याबाबत ते म्हणाले की, एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो ,तो काही असाच होत नाही. फाईलवर निर्णय झाला असणार. भाजपा सरकार प्रत्येक वेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारने थट्टा केली आहे. यापूर्वीचे निर्णयदेखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत, अशी खरमरीत टीका जयंत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button