आमचे सरकार शेतकऱ्यांना समर्पित – निर्मला सीतारामण

Nirmala Sitharaman

दिल्ली :- आमचे सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने सरकार काम करते आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत तीन टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र रुतून बसले होते. याचा फटका जीडीपीला बसला. अनेक क्षेत्रांची पीछेहाट झाली असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला होता. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकऱ्यांना आणि शेतीसाठी काय तरतूद करणार याकडे लक्ष होते. अर्थमंत्री सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचे सरकार शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगत हमीभावाबद्दल माहिती दिली.

सीतारामण म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्याला मोदी सरकारने मदत दिली. तांदूळ, गहू, डाळ वर्गीय शेतमालांच्या हमीभावात वाढ केली. शेतमालाची खरेदी वाढवण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचे उद्दिष्ट १६.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. एक हजार कृषी बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४० हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. सूक्ष्म जल सिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे.

‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेची माहिती देताना सीतारामण यांनी घोषणा केली की, अनेक पिकांचा समावेश करण्यात येईल आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहचवला जाईल. हमीभावामध्ये मोठा बदल झाला आहे. २०१२ मध्ये शेतकऱ्यांना हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये देण्यात आले होते. २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले गेले. फक्त गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना २०२०-२१ मध्ये ७५ हजार कोटी रुपये हमीभावापोटी देण्यात आले.

ही बातमी पण वाचा : अर्थ संकल्प 2021 : विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER