आपले भविष्य आपल्या हाती

Our future is in our hands

सुमती काकूंनी सकाळच्या चहाबरोबर पेपर वाचायला घेतला, सगळीकडे चाललेल्या महामारीचे थैमान आणि निधन वार्ता मध्ये असलेल्या वीस पंचवीस नावांमध्ये ओळखीचा चेहरा दिसत नाही ना म्हणून हलकेच नजर टाकून त्यांनी पेपर बाजूला ठेवला. धडधडत्या चितांचे फोटो बघून छातीवर दडपण आल्यासारखे झाले. ही स्थिती सुमती काकुंसारख्या वयाने भरपूर जेष्ठ असलेल्याची नाही होणार तरच नवल ! त्यांचे नेत्र पैलतीरावर लागलेले आहेत त्यांचा विचार हे मिडीयावाले केव्हा करतील? करतील का? हे त्यांनाच ठाऊक. एक दीर्घ सुस्कारा सोडून त्या महाराजांसाठी मंजिर्यांचा हार करावा म्हणून वळल्या .समोरचा चहाचा कप कसाबसा त्यांनी संपवला पण नाश्त्याची दिशा मात्र त्यांनी बाजूला सरकवून त्याच्यावर झाकण टाकले.

दोन चार दिवसांपूर्वी अमृता चा फोन आला. तुझ्याकडची स्वयंपाकाची बाई माझ्याकडे काम करेल का म्हणून. तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली तरी काही उठून कराव असच वाटत नाही म्हणाली. वातावरणामुळे मानसिकताच तशी होते आहे असेही म्हणाली.

हे परिस्थितीला अनुरूप अस उठलेलं नकारात्मकतेचे वादळ. पण इतरही वेळा अधून-मधून अशा वावटळी प्रत्येकाच्या मनात उठत असतात. कधी त्या केवळ झळा असतात आणि वाढत जाऊन वावटळी बनतात ,इतक्या की त्यांना थांबवणे अवघड जाते. सतत काहीतरी वाईट घडेल अशी भीती, अपघात होईल का? मला किंवा कोणाला आजार होईल का? सततची मृत्यूची भीती, किंवा अकस्मात काहीतरी संकट येण्याची अनामिक भीती ,चिंता हे नकारात्मक विचार आहेतच यामुळे कितीही प्रयत्न केला तरी ह्या शंका पाठ सोडत नाहीत. एवढेच नाही तर सतत दुसऱ्यांचे दोषच बघणे, नावे ठेवणे, कधीही कुणाचे मोकळ्या मनाने कौतुक करू न शकणे आपल्याच विचारात रहाणे हे सगळं सगळं नकारात्मक विचारांचा भाग आहे.

सध्याच्या या वेदना ग्रस्त जगासाठी लुईस एल हे यांच्या उपायांचा खूप उपयोग होऊ शकतो.” यू कॅन हील युवर लाईफ “या त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी या विषयाचा सविस्तर आढावा घेतला आहे. आणि आणि त्यांचे हे सगळे विचार आणि प्रयोग त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित असल्याने त्याला वास्तविकतेची खूप मोठी जोड आहे. योग्य शारीरिक व मानसिक स्थितीसाठी आणि उत्तम प्रकारे जगण्यासाठी कशाप्रकारे जगायचे हे त्यांनी सांगितले आहे. लुईस यांना लहानपणी अतिशय वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले, कित्येक शारीरिक आणि मानसिक अत्याचार त्यांनी सोसले पण अशा प्रकारच्या सकारात्मक विचारातूनच त्या बाहेर आल्या, आणि त्यांनी त्यांचे आयुष्य घडवले.

  • मुळात लुईस एल हे यांच्या विचारसरणीचे काही महत्त्वाचे मुद्दे आहे .ज्यावर त्यांचे सर्व उपाय अवलंबून आहेत.
  • आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. वर्तमान काळात खूप शक्ती साठवलेली आहे. प्रत्येकाचे विचारच त्याचे भविष्य घडवत असतात.
  • प्रत्येक व्यक्ती नकारात्मक विचार करत राहते जसे की माझ्यात काही च चांगले नाही, मी चूक आहे,
  • प्रत्येकाच्याच मनात कमी-अधिक प्रमाणात अपराधीपणाची भावना,चीड ,टीका असतेच. या सगळ्या विचार आणि भावना मधूनच आपल्या शरीरात सर्व रोग आपण निर्माण करतो.

म्हणूनच भूतकाळ विसरणे ,क्षमा करणे, स्वतावर प्रेम करणे ,स्वतःचा स्वीकार करणे यातून सकारात्मक बदल घडवून आणता येतात आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करू लागलो तर आयुष्यातली प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते असे लुईस हे यांनी म्हटले आहे.

आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. उदाहरणार्थ “सगळे लोक मला टाळतात.” आणि “सगळेजण मला मदत करतात.”या दोन पैकी जे आपल्याबद्दल आपल्याला वाटतं तसा वेगवेगळा अनुभव आपल्याला येतो .लुईस हे म्हणते की आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या प्रतिक्रियांवरून आपण कसे आहोत ? जग कसे आहे? हे आपण शिकतो. आई-वडिलांशी आपले आणि त्यांचे परस्परांशी असणारे नाते तसेच आपण वागतो. पण म्हणून भूतकाळामधील गोष्टीत टिकून न राहता आताच्या , वर्तमानाच्या विचारावर आपला भविष्यकाळ अवलंबून असतो .आणि हे विचार आपण बदलवू शकतो.

म्हणूनच सर्वप्रथम मागचं सगळं विसरून जाण्यासाठी क्षमा करायला शिका. “माझ्या अपेक्षेप्रमाणे तू वागला नाहीस ,तरी मी तुला क्षमा करीत आहे ,तुला मुक्त करीत आहे.”अशाप्रकारे मनातली सगळी किल्मिष जर धुवून टाकली तर मन मोकळं होतं .सगळ्या नकारात्मक विचारांचा शरीरावर अनिष्ट परिणाम कसा कसा होतो हे लुईस हे यांनी दाखवून दिले आहे. अपराधी भाव तर वेदना, स्वतःवर सतत टीका करीत असू तर संधिवात, भीती व तणाव यामुळे केस गळतात , आंत्रावण होतो.

बदल करायचा हे ठरवणे ही महत्त्वाची पायरि होऊ शकते .

असे ठरवल्यानंतर सकारात्मक वाक्य, व सूचना ठरवून म्हणता येतात.” मी संपुर्ण निरोगी आहे,” I am a peaceful soul.”, ” I am getting better and better day by day.”अशा स्वयंसूचना जर तर रोज स्वतःला दिल्या गेल्या तर आपण नकारात्मक त्यातून बाहेर येऊ शकतो. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर आरोग्यपूर्ण सकाळ दाखविल्याबद्दल या परमेश्वराबाबत कृतज्ञता व्यक्त करणे, आपले कुटुंबीय ज्यांच्यात मी सुरक्षित आहे, आजुबाजूचा सुंदर निसर्ग, संपूर्ण वसुंधरा यांच्याही बाबतीत कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

“यू कॅन हील युवर लाईफ” या लुईस हे यांच्या पुस्तकात त्यांनी वेगवेगळ्या आजारांसाठी कुठकुठल्या भावना जबाबदार असतात आणि त्यासाठी कोणत्या स्वयंसूचना वापराव्या याचे सविस्तर विवेचन दिले आहे. म्हणजे काय आपले भविष्य आपल्या हाती म्हणतात तेच खरे !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button