आमची लढाई सरकारविरोधात नाही, केवळ न्याय हक्कासाठी; संभाजीराजेंचे स्पष्टीकरण

Sambhaji Raje

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी आज मराठा आरक्षणासाठी रायगडावरून आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर संभाजीराजे यांनी सकल मराठा संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आमची चळवळ अराजकीय आहे. कोणत्याही पक्षाचा आमच्या लढ्याशी संबंध नाही. आमचा लढा सरकारविरोधात नाही. केवळ समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे, संभाजी छत्रपती यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, आमचा कुणालाही विरोध नाही. आमच्या मागण्याही अगदी रास्त आहेत. त्यावर मी काही उपाय सुचवले आहे. आम्ही पाच मागण्या केल्या आहेत. त्याच भोसले समितीने केल्या आहेत. आम्ही सांगितलेल्या पाच मागण्यापूर्ण करण्यासाठी कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. त्या सरकारने लागू कराव्यात. आमचा लढा सरकारविरोधात नाही. केवळ समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आमच्या आंदोलनात यायला कोणालाही बंधन असणार नाही. आमची अराजकीय चळवळ आहे. मराठा समाजाला न्याय मिळून देण्याचा आमचा उद्देश आहे. यापेक्षा कोणताही उद्देश नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, पक्ष आणि संघटना स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. या बैठकीत पक्ष, संघटना स्थापन करण्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्या दिवशी पत्रकारांनी विचारलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. यावेळी त्यांना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंबाबत प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं. त्या व्यक्तिबाबत मला का विचारता?. माझी त्यांच्याशी तुलना का करता? मराठा समाजासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्यांचं कौतुकच आहे. पण त्या मला का ओढता?, असा उलटप्रश्न त्यांनी केला.

यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही राजे एकच आहेत. त्यात वेगळेपण नाही. दोन्ही राजे देखणे आहेत, असं सांगतानाच उदयनराजेंशी भेटून चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे हे माझ्या संपर्कात होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अजित पवार यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मला देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना मॅसेज करुन आमच्या मागण्या कळविल्या आहेत. त्यामुळे पुन्हा काय चर्चा करायच्या? म्हणून अजितदादांना भेटलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button