अन्यथा लोकसेवा आयोगाची परिक्षाच होऊ देणार नाही : गोपीचंद पडळकर

सांगली :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची जाहिरात प्रसिध्द केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरिक्षक पदाच्या एकूण 605 जागा आहेत. एनटी क वर्गाला आरक्षणाच्या टक्केवारी नुसार 22 जागा यायला पाहिजेत, परंतु जाहिरातीत केवळ दोन जागा दाखवून उर्वरित वीस जागा चोरलेल्या आहेत. त्यामुळे जागांमध्ये बदल करुन आयोगाने सुधारित जाहिरात त्वरीत प्रसिध्द करावी, अन्यथा ही परिक्षाच होऊ देणार नाही, असा ईशारा भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

पडळकर म्हणाले, आरक्षणाची टक्केवारी निश्चित असल्याने त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आयोगाने दिलेल्या जाहिरातीत पोलीस उपनिरिक्षकांची एकूण 605 पदे भरली जाणार असतील धनगर समाजाच्या वाट्याला 22 जागा यायलाच पाहिजेत. इतके साधे गणित आयोगाच्या अध्यक्षांना येत नसेल तर त्यांना जनावरांच्या गोठ्यात पाठविले पाहिजे. एखादी राजकीय व्यक्ती त्या पदावर असतीतर जागांची अदलाबदल, चोरी होऊ शकते, हे आम्ही समजू शकतो. परंतु आयोगाचे अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांच्या स्वाक्षरीने होते. ते घटनात्मक पद आहे. असे असतानाही धनगर , वंजारी समाजाच्या वाट्याला येत असलेल्या जागांची चोरी होत आहे. 2010 पासून आतापर्यंत झालेल्या पोलीस उपनिरिक्षक पदांच्या जागांच्या प्रमाणात धनगर समजाच्या वाट्याला 293 जागा आल्या पाहिजे होत्या. परंतु त्यापैकी दोनशेच जागा भरल्या आहेत. म्हणजे 93 जागांचा थेट अपहार झालेला आहे. मग या जागा कोणाच्या वाट्याला दिल्या गेल्या. असे करण्याचे कारण काय ?, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

एनटी क च्या टक्केवारीनुसार जागा दिल्या गेल्या नसल्याची बाब आपण आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलेली आहे. मु‘यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते माजी मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत्तही हा प्रकार कळवणार आहोत. प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत रात्रंदिवस अभ्यास करणार्‍या गोरगरिबांच्या मुलांची अशा प्रकारे घोर फसवणुक करुन त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यानंतरही धनगर आणि वंजारी समाजाला हक्काचा न्याय मिळाला नाहीतर तीव‘ आंदोलन करु. आयोगाच्या अध्यक्षांची गाढवावरुन वरात काढू, असा ईशाराही पडळकर यांनी यावेळी दिला आहे.