
कोल्हापूर : राज्य शासनाने नव्या कृषी कायद्यांना स्थगिती दिली याचे स्वागत आहे. मात्र, येत्या दोन दिवसात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात. अन्यथा महाराष्ट्रातही दिल्लीपेक्षा उग्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाने शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन दोन दिवसात तोडगा काढावा. नाही तर एकाही केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही. मंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमात घुसून जाब विचारु, अशा कडक शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) मंगळवारी इशारा दिला.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा असणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कार्यकर्ते केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करत असतानाच प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यावरुन पोलीस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांवर केंद्राकडून अन्याय सुरु आहे. कृषी कायदे उद्योगपतींना शेतकऱ्यांना उद्योगपतींना लुटता यावेत यासाठीच केले आहेत.
केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयानातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन हे खलिस्तानवादी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगत शेतकरी आंदोलनाची बदनामी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनास कोणीही धार्मिक, प्रांतिक, जातीय वळण देवू नका. कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकरी आहे हे आम्ही दाखवून देवू. संपातलेल्या बळीराजाच्या मागण्या मान्य करुन त्यांना शांत करा, अन्यथा देश पेटून उठेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला