राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची उपस्थिती

राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची उपस्थिती

मुंबई : राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. २६ मे रोजी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स  क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार सोहळा पार पडेल. हे पुरस्कार सोहळ्याचे ५६ वे वर्ष आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

ऑस्करच्या स्थापनेपासून ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष यापूर्वी कधीच भारतात आले नव्हते. भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष असून मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्यामार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही तावडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा 18 मे पासून स्टार प्रवाहवर

राज्य मराठी चित्रपट सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर विशेष योगदान जीवन गौरव पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारांचे वितरणसुद्धा  २६ मे रोजी पार पडेल.