“ओसरी : एक फ्रेंडशिप बेंच !”

Osiris

आम्ही रामनवमीच्या उत्सवासाठी (Ram Navami) गावी गेलो की “आबा “म्हणजे (बाबा — माझे सासरे) आलेले कळल्याबरोबर गावातील लोक खुशाली, वास्तपुस्त करायला आबांना भेटायला ओसरीवर जमतात. मग वर्षभराची माहितीची देवाणघेवाण ! कोणाचं काय तर कोणाचं काय .त्या गप्पातूनच ते त्यांचे ‘ ‘सुख दुख आबाले सांगत रायतात ! ‘ आबा चा सल्ला घेतात. त्यांना चहा ,पाणी ,सरबत हातावर प्रसाद, असं काहीतरी देण्याचं काम आमचं असत. ते करत असताना मी हा सोहळा ‘एन्जॉय ‘ करत असते. बाबा त्यांच्या मोठ्या लाकडी तखतावर बसलेले, आणि बाजूनी हा लोकांचा , ‘मजमा ‘! ही परिस्थिती आजची नाही ,तर फार पूर्वीपासून घरातली वडील मंडळी, मावशी आजी, आजोबा “त्याच” ओसरीवर बसून लोकांचे दुःख दूर करताना ,त्यावर मायेची फुंकर घालताना मी बघितले आहेत .

“ती ओसरी “बघितली की मला मानसशास्त्रातील, सकारात्मक मानसिकता व भावनिक आरोग्याचा वापर ,सर्व स्तरावर होण्यासाठी उपयोगात येणारे एक साधन आठवते. त्याला म्हणतात, “फ्रेंडशिप बेंच !” नैराश्यसारख्या आजारांसाठी व त्यावरील मानसिक उपचारांसाठी, स्थानिक आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देऊन गरजुनशी अत्यंत अनौपचारिक पणाने हितगुज करायला शिकवणे.

झिंबाब्वे मध्ये 2005 हे वर्ष तेथील लोकांसाठी फार मोठे दुःख देणारे ठरले .तेथील शासनाने “ऑपरेशन रिस्टोअर ऑर्डर “नावाची एक मोहीम सुरू केली .या मोहिमेद्वारे बेकायदा बांधकामे, बेकायदेशीर झोपडपट्ट्या अक्षरशः काहीच दिवसात जमीनदोस्त करण्यात आल्या .अनेकांचे भयंकर नुकसान झाले .लोक बेघर झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या .व्यवसाय बुडाले. तेथील लोक या मोहिमेला “झिंबाब्वेतील सुनामी “असे संबोधू लागले.

तेथील “हरारे “गावातील लोकांची ही स्थिती अशीच होती .त्यांचे सारे भावविश्वच उध्वस्त झालेले ! प्रचंड नैराश्याने त्यांना घेरले होते. अनेकांना जीव नकोसा झाला ,इतके प्रचंड नैराश्य” म्बारे ” गावातील बहुतांश लोकांनी अनुभवले. तो त्रास त्यांनी एका शब्दात “कुफूनगी सिसा” अर्थात एखाद्या गोष्टीचा किंवा घटनेचा अतीव विचार केल्याने होणारा मानसिक त्रास ! असा व्यक्त केला.

हातात ज्यांच्या केवळ शून्य होते आणि विचारांच्या वादळात ही माणसं भेलकांडत होती. ज्या प्रमाणात मानसिक उपचारांची गरज होती ,तितके डॉक्टर आणि समुपदेशक नक्कीच पूरले नसते. म्हणूनच लहान सहान उपचारांसाठी लोकांना आपले वाटतील, वेळ देऊ शकतील, असे संवेदनशील आणि विवेकाधिष्टीत मार्गदर्शन करणारे आणि वयोगटही पन्नासच्या पुढील म्हणजे कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्यांच्याबरोबर शेअर करायला काही वाटत नाही, अशा लोकांची आणि अशा जागेची मागणी त्यांनी केली.

” हरारेतील म्बारे “या गावात अत्यंत गर्दी च्या दवाखान्यात, बाहेरच्या ‘ओसरीत ‘शास्त्रीयदृष्ट्या तपासल्या गेलेल्या एका मानसिक उपचार पद्धतीची चाचणी करायची असे ठरले यालाच “फ्रेंडशिप बेंच पद्धती “असे नाव देण्यात आले आहे ! मानसोपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून प्रथम एक प्रश्नपत्रिका भरून घेतली जाते .या प्रश्नपत्रिकेत काही साधे पण खूप महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात येतात. जसे की तुम्हाला झोप लागण्यात काही त्रास होतो का ? फार चिंताग्रस्त आहात का? आर्थिक परिस्थिती ?त्यांचे आजार? इ. आणि नंतर त्यांना आरोग्य सेवक आजीकडे पाठविले जाते .त्या दवाखान्यातील आवारात लाकडी बाक टाकण्यात आलेली आहेत .निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या हसतमुख प्रौढ व्यक्ती ,कुठल्याही कृत्रिमतेचा आव न आणता ,रुग्णाचे म्हणणे ऐकून घेतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले असते .बहुतांश लोकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना स्थानिक लहान उद्योजकांशी जोडून देण्याचा प्रयत्नही या उपक्रमाद्वारे केला जातो .आरोग्यसेवका बरोबरची सहा सत्रे केली जातात ,त्याची पद्धतशीर मांडणी आहे.

  • १) रुग्णांची गरज प्रश्न न समजून घेणे.
  • २) त्यावर विचार करण्याच्या उद्देशाने रुग्णाच्या घराला भेट देऊन कुटुंबाची ओळख करून घेणे.
  • ३) शक्य त्या सर्व उपचारांची पडताळणी करुन गरजेनुसार रुग्णास योग्य व्यक्तीशी जोडणे.
  • ४) रुग्णाला ध्येय आराखडा करण्यास मदत आणि थोडा गृहपाठ देणे आवश्यक असल्यास इतर सहाय्यक गटांशी जोडून देणे.
  • ५)अडथळ्यांना पार करण्यास आखणी केली जाते नेमके काय साध्य होते आहे काय करताना अडचणी येतात याविषयी मोकळेपणी चर्चा करणे.
  • ६) सगळ्या सूत्रांचा गोषवारा .

दर महिन्याला एकदा मनोविकार तज्ञ येथील रुग्णांना तपासतो याचा फायदा आजवर अनेकांना हिंसाचाराने मानसिक आजारी बनलेले, एड्समुळे निराशा आलेले तणावग्रस्त एकाकी लोक यांना फायदा झाला. फ्रेंडशिप बेंच मधील सहभागी लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे विचार तुलनेने पाच पटींनी कमी झाले आणि झिंबाब्वे तील यशस्वी झाल्याचे लक्षात आले.

केवळ झिम्बाब्वे तच नाही तर सध्या सगळ्या जगात आणि आणि भारतात नैराश्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे माणसाला व्यक्त होण्यासाठी जागा असण्याची निकड दिवसेंदिवस वाढते आहे.म्हणजेच मानसिक आरोग्याची दयनीय स्थिती जर बदलायची असेल तर समाजात सर्वांना खुली अशी मानसिक उपचार सेवा सुरू करणे अपरिहार्य आहे.सध्याच्या कोरोना काळामध्ये तर भीती चिंता नैराश्य यांनी यांनी सर्व परिसर ग्रासला आहे.

* खरं तर मानसोपचार तज्ञ कमी आहेत ,असे म्हटले जाते .परंतु बऱ्याच होतकरू नवमानसोपचार तज्ञांना कुठे पेशंट हाताळायचे ? कुठे आपले स्किल वापरायचे? हा प्रश्न असतो .शेवटी कौन्सिलिंग हे स्किल आहे .ते सरावानी पण विकसित होते. अशा वेळी अगदी अनभिज्ञ लोकांना प्रशिक्षण देण्या ऐवजी याच विद्यार्थ्यांचा उपयोग जर थोड अधिक प्रशिक्षण आणि मानसरोगतज्ञांचे मार्गदर्शन मिळवून अशा कामांसाठी केला गेला ,तर खूप फायदा होऊ शकतो.

*मानसिकता बदल केव्हा होणार?मला काही प्रॉब्लेम आहे हे सांगण्याचा इतका स्तीगमा आणि भीती समाजात आहे त्यासाठी कुठे दवाखान्यात क्लिनिकला जाण्याची लोकांना लाज वाटते त्याऐवजी ही अनौपचारिक पद्धत किंवा साधन उपयुक्त आहे.

*आपल्याकडे आज आयुष्याची लांबी खूप वाढली आहे. फिटनेस भरपूर असताना रिटायरमेंट येते. अशा लोकांना थोड्या प्रशिक्षणाने हे काम शिकवले ,तर त्यांनाही काही काम मिळून त्यांचा वेळ चांगला जाईल .दोन पैसे गाठीशी मिळाले तर तेही समाधानी राहतील. गडचिरोलीत डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी गावातील बायकांना प्रशिक्षित करून बालमृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्याचे कार्य केले .तशीच आपली सीनियर पिढी पण अजून छान फिट असलेली आहे. त्यांच्या साह्याने निसर्गाच्या सानिध्यात मन मोकळ करून व्यक्ती लवकर सावरू शकते. “फ्रेंडशिप बेंच ती अशीच मैत्रीपूर्ण घराची ओसरी आहे!” हे लक्षात ठेवू या. इतिहासातून आपण शिकत असतो . झिंबाब्वे ने रुजवलेली ही संकल्पना आपणही वापरून बघण्यासारखी आहे.

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER