जाणून घ्या युएस ओपन जिंकताना ओसाकाने कोणते केले विक्रम

Naomi Osaka.jpg

जपानच्या (Japan) नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) दुसऱ्यांदा युएस ओपन (US Open) जिंकताना बरेच विक्रम केले आहेत. त्यापैकी पटकन लक्षात येणारा म्हणजे ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ती एकदाही पराभूत झालेली नाही. ज्या ज्या वेळी तिने ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, (खरं तर चौथी फेरी पार केली त्या त्या वेळी) तिने फक्त विजयच मिळवला आहे. 2018 ची युएस ओपन, 2019 ची ऑस्ट्रेलियन ओपन आणि आता यंदाची युएस ओपन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा तिने जिंकल्या आहेत.

ही बातमी पण वाचा:- ओसाकाने तीन वर्षात दुसऱ्यांदा जिंकली युएस ओपन स्पर्धा 

ओसाकाचे वय सध्या 22 वर्षे असून कमी वयात तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती मारिया शारापोव्हा नंतरची पहिलीच खेळाडू आहे. तिने अंतिम सामना 1-6, 6-3, 6-3 असा जिंकला. युएस ओपनच्या इतिहासात गेल्या 25 वर्षात प्रथमच कुणी महिला एकेरीचा अंतिम सामना पहिला सेट गमावल्यावर जिंकला आहे. यापूर्वी 1994 मध्ये स्पेनच्या अरांता सांचेझ व्हिकारियोने याप्रकारे युएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

अंतिम सामन्यातील दोन्ही खेळाडू नाओमी ओसाका व व्हिक्टोरिया अझारेंका यांच्या नावावर प्रत्येकी दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदं होती. अशा दोन खेळाडूंमध्ये झालेला हा 1967 नंतरचा हा पहिलाच अंतिम सामना होता.

आपल्या पहिल्या तीन ग्रँड स्लॅम अंतिम लढती जिंकणारी ती खुल्या युगातील (1968 नंतरची) केवळ पाचवीच महिला खेळाडू आहे. या खेळाडू अशा…

  • *नाओमी ओसाका (2018, 2020 युएस ओपन, 2019 ऑस्ट्रेलियन ओपन)
  • *जेनिफर कॕप्रिएती (2001, 02 आॕस्ट्रेलियन ओपन, 2001 फ्रेंच ओपन)
  • *लिंडसे डेव्हेनपोर्ट ( 1998 युएस ओपन, 1999 विम्बल्डन, 2000 ऑस्ट्रेलियन ओपन)
  • *मोनिका सेलेस (1990 व 91 फ्रेंच ओपन, 1991 ऑस्ट्रेलियन ओपन)
  • *व्हर्जिनिया वेड ( 1968 युएस ओपन, 1972 ऑस्ट्रेलियन ओपन, 1977 विम्बल्डन)

यंदाच्या युएस ओपनमध्ये महिलांचे उपांत्य फेरीचे दोन्ही आणि अंतिम फेरीचा सामना हे शेवटचे तिन्ही सामने पूर्ण तीन सेट रंगले. 1980 नंतर युएस ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच असे घडले.

यंदा ही स्पर्धा जिंकताना नाओमी ओसाकाने सात सामने खेळले आणि या प्रत्येक सामन्यावेळी अमेरिकेत वर्णद्वेषी अत्याचाराच्या बळी पडलेल्या व्यक्तींच्या नावाचा मास्क लावून ती मैदानात उतरली. अमेरिकेतील दडपशाहीकडे लक्ष वेधून घेण्याच्या तिच्या या कृतीची जगभर चर्चा आहे. या आपल्या अनोख्या कृतीत ती अंतिम सामन्यात तामीर राईस ह्या मुलीच्या नावाचा मास्क घालून खेळली. उपांत्य सामन्यात फिलँडो कास्टाईल, उपांत्यपूर्व सामन्यात ट्रेव्होन मार्टीन, चौथ्या फेरीत अहमद आर्बेरी, तिसऱ्या फेरीत जाॕर्ज फ्लाईड, दुसऱ्या फेरीत एलिजा मॕक्लेन आणि पहिल्या सामन्यात ब्रेनोना टेलर यांच्या नावाचा मास्क लावून ती मैदानात उतरली होती. ह्या सर्व व्यक्ती अमेरिकेत वर्णद्वेषाच्या बळी पडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER