
गेल्या २० सामन्यांपासून ती अपराजीत होती. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम सामन्यात ती अपराजीत होती. ही अपराजीत राहण्याची मालिका ती कायम राखेल असेच अपेक्षीत होते आणि झालेही तसेच. अपेक्षेप्रमाणे जपानच्या नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) सरळ सेटमधील सहज विजयासह ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) महिला विजेतीच्या ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी (Jennifer Brady) हिच्यावर ६-४, ६-३ असा विजय मिळवला आणि आपले चौथे स्लॅम अजिंक्यपद पटकावले. हा सामना सव्वा तासातच आटोपला आणि त्यासह ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचले की हरायचेच नाही हा लौकिक तिने कायम राखला.
ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या जेनिफरने पहिल्या सेटमध्ये चांगला प्रतिकार केला परंतु त्यानंतर मात्र तिचा खेळ फिका पडला. ब्रॅडीच्या नावावर आधीच्या तीन लढतीत ओसाकावर एक विजयाची नोंद असली तरी शनिवारी ती त्याची पुनरावृत्ती करू शकली नाही. या यशासह नाओमी ओसाका ही सिमोना हालेपला मागे सारून क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचणार आहे.
या सामन्यानंतर ओसाका म्हणाली की हा मैदानावरील कौशल्यापेक्षा मनाचा सामना होता. मी अस्वस्थ होते. सामन्याआधी आपला खेळ कदाचित चांगला होणार नाही अशी मला शंका होती. पण मी स्वत: वर दडपण येऊ दिले नाही आणि प्रत्येक गुण महत्वाचा मानून खेळ केला.
ब्रॅडी म्हणाली की, मी चांगला खेळ केला असे वाटत नाही पण मी या स्तराची खेळाडू आहे असे मला वाटते. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे शक्य आहे. आवाक्यात नक्कीच आहे असा आशावाद तिने व्यक्त केला.
भविष्यातील योजनांबद्दल ओसाका म्हणाली की, चार स्लॅम विजेतेपद झाली. आता मी पाचव्याचा विचार करतेय. टप्प्याटप्प्याने विचार करतेय. पाच नंतर दहांच्या टप्प्याचा विचार करेल. छोटी लक्ष ठेवावीत, एकदम मोठी स्वप्ने पाहू नयेत असे मला वाटते.
या स्पर्धेत ओसाकाचा खरा कस लागला तो चौथ्या फेरीच्या सामन्यात. त्यावेळी गर्बाईन मुगुरुझाला तिच्याविरुध्द मॅचपॉईंट होता पण ओसाकाने सामना निसटू दिला नव्हता. अगदी सेरेना विल्यम्सलासुध्दा ितने मात दिली. आता महिलांच्या गेल्या ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी चारची विजेतेपदं तिच्या नावावर आहेत. गंमत म्हणजे तिच्या नावावर आता ग्रँड स्लॅम जेतेपदं अधिक (४) आणि महिला टेनिस संघटनेच्या टूरची (WTA tour) कमी (३) विजेतेपदं आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला