ओसाकाने तीन वर्षात दुसऱ्यांदा जिंकली युएस ओपन स्पर्धा

Osaka US open champ again

काय कान्फिडन्स होता तिचा? स्पर्धेच्या सुरुवातीलाच तिने सामाजिक समतेचा संदेश देणारे सात मास्क (Mask) बनवून ठेवले होते. म्हणजे तिला खात्री होती की आपल्याला या सात मास्कची गरज पडणार आहे. आपण सात सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणार आहोत आणि तिने ते करुन दाखवले. त्याच्याही एक पाऊल पुढे जात तिने थेट विजेतेपद पटकावले आणि आपला सामाजिक समतेचा मुद्दा आपल्या कर्तृत्वाने अधिक ठळकपणे अधोरेखीत केला.

जपानच्या नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) तीन वर्षात दुसऱ्यांदा युएस ओपनची (US open Tennis) ट्रॉफी उंचावली. शनिवारच्या अंतिम सामन्यात तिने 1-6, 0-2, 30-40 या स्थितीतून बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकावर (Viktoria Azarenka) 1-6, 6-3, 6-3 असा विजय मिळवला आणि आपले तिसरे ग्रँड स्लॕम विजेतेपद (Grand slam title) पटकावले.

हे यश तिला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी तर पोहोचवेलच, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट ही झाली की, जर ती यशस्वी झाली नसती तर लोकांना संधी मिळाली असती हे बोलण्याची की, आपले काम आहे खेळायचे, समाज सुधारक बनण्याचे नाही. आधी खेळाकडे लक्ष द्या, मग इतर गोष्टी बघा असे तिच्याबद्दल बोलायला लोकांनी कमी केले नसते, पण आता नाओमीच्या यशाने त्यांची तोंड बंदच राहणार आहेत.

दुसरीकडे बिगर मानांकित बेलोरशियन ‘माता’ खेळाडू व्हिक्टोरिया अझारेंकाचे कौतुकच करायला हवे. 2013 नंतर पहिल्यांदाच ग्रँड स्लॕम अंतिम फेरीत खेळताना तिने ज्या पध्दतीचा खेळ केला त्याने निम्म्या सामन्यापर्यंत तर ओसाकाला काही संधीच नाही असे वाटले होते. 6-1, 2-0 अशा आघाडीतून तिचा पराभव होईल असे वाटत नव्हते, पण यापूर्वी एकदा सेरेनाविरुध्दसुध्दा सामना जिंकायच्या उंबरठ्यावर असताना आणि स्वतः ची सर्व्हिस असताना ती जिंकू शकली नव्हती. शनिवारी तेच घडले. अतिशय भक्कम स्थितीचा ‘व्हिका’ला फायदा उचलता आला नाही. मात्र अंतिम फेरीपर्यंतची ही कामगिरी तिला आता जागतिक क्रमवारीत 14 वे स्थान देणार आहे आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा लिओ याला आपली आई किती चांगली खेळाडू आहे हे सांगण्यासाठी आणखी एक उदाहरण देणार आहे.

सामन्यात दोन वेळा व्हिकाला नामी संधी होती.पहिल्यांदा 6-1, 2-0, 40-30 या स्थितीत ती सरळ सेटमध्येच सामना संपवू शकली असती. पण पुढे तीनदा तिने सर्विस गमावून ओसाकाला पुढच्या सात पैकी सहा गेम घेऊ दिले आणि सामना तिच्या हातून निसटला.निर्णायक तिसऱ्या सेटमध्येही 1-5 पिछाडीवरुन 3-4 अशी मुसंडी मारत तिने आशा वाढवल्या होत्या. तिचीच सर्विस होती पण पुन्हा ओसाकाने तिला संधीच दिली नाही. व्हिका जिंकली असती तर महिलांमध्ये सर्वाधिक काळानंंतर ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकायचा तिने विक्रम केला असता. यापूर्वी 26 जानेवारी 2013 ला ती आॕस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरली होती आणि त्यानंतर तब्बल 7 वर्ष 231 दिवसांनी तिला विजेतेपदाची संधी होती.

या चढउताराच्या सामन्याबद्दल ओसाका म्हणाली की, हा सामना 1-6, 0-2 स्थितीतून गमावला असता तर तासाभरातच सामना गमावण्याची नामुष्की आली असती.तसे झाले असते तर ती फारच लाजिरवाणी गोष्ट झाली असती. पण व्हिका, आणखी अंतिम सामन्यांमध्ये प्लीज तू समोर नसावीस कारण माझ्यासाठी फार अवघड होऊन जाते. मी तुला खेळताना बघायची आणि आता तुझ्याशी खेळायला मिळतेय ही फार मोठी गोष्ट आहे.

वंशवादाचे बळी ठरलेल्या व्यक्तींच्या नावाचे मास्क लावुन मैदानात उतरण्याबद्दल ती म्हणाली की, लोकांमध्ये या विषयावर चर्चा सुरु व्हावी हा माझा हेतू होता. मी तर बायोबबल मध्ये होते आणि बाहेर संपर्क नव्हता. म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांचे लक्ष वेधण्याचा हाच एक मार्ग होता. त्याला जेवढे रिट्वीट मिळत गेले तेवढी चर्चा होत गेली.

अझारेंका म्हणाली की, नाओमी आणि तिच्या चमूचे अभिनंदन. आम्ही आणखी काही अंतिम सामने खेळू अशी आशा आहे. अशा कठीण काळातही जे लोक एकत्र आले आणि ज्यांनी ही स्पर्धा घेतली त्यांना धन्यवाद. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या चमूलाही धन्यवाद. फार लांबचा पल्ला आम्ही गाठला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER