
- सौदीमध्ये ‘चुकून’ दफन केल्या गेलेल्या प्रेताचे प्रकरण
नवी दिल्ली : नोकरीनिमित्त सौदी अरबस्तानात गेलेल्या संजीव कुमार नावाच्या भारतीय नागरिकाचे तेथे ‘चुकून’ दफन केले गेलेले पार्थिव रीतसर अंत्यसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर भारतात परत आणण्याकरिता काय केले जाऊ शकते, याची माहिती घेण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयातील एका उपसचिवांना गुरुवारी जातीने न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. संजीव कुमार यांच्या विधवा पत्नी अंजू शर्मा यांनी केलेल्या याचिकेवर न्या. प्रतिभा सिंग यांनी हे निर्देश दिले. आपल्या पतीचे सौदीमध्ये ‘चुकून’ मुस्लिम रिवाजानुसार दफन केले गेलेले पार्थिव मृताच्या हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी पुन्हा उकरून भारतात परत आणण्याचे आदेश सरकारला द्यावेत, यासाठी ही याचिका केली गेली आहे.
न्या. प्रतिभा सिंग यांच्यापुढे याचिका सुनावणीस आली तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाचे स्थायी वकील रिपुदमन भारद्वाज यांनी याचिकेचे उत्तर देण्यासाठी आणि हे प्रकरण सध्या कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती घेण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्याची विनंती केली. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती त्यांना म्हणाल्या, या प्रकरणाचे स्वरूप काय आहे, हे तरी तुम्हाला माहीत आहे का? याचिकाकर्त्या जानेवारीपासून पाठपुरावा कराताहेत, हे पाहता एव्हाना तुम्ही स्वत:हून योग्य ती पावले उचलालयला हवी होती. पण आजची स्थिती अशी आहे की, एकदा पुरलेले पार्थिव बाहेर काढून आणता येईल का, हेही तुम्हाला माहीत नाही. त्यावर भारद्वाज म्हणाले की, आम्हाला पाठपुरावा करावा लागेल. बरेच प्रदीर्घ प्रयत्न करावे लागतील. न्या. प्रतिभा सिंग यांनी १० दिवसांची वेळ न देता परराष्ट्र मंत्रालयातील उपसचिवांना गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने कोर्टापुढे हजर होण्यास सांगितले.
संजीव कुमार यांचे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयक्रिया बंद पडून २४ जानेवारी रोजी सौदी अरबस्तानातील जिझान येथील इस्पितळात निधन झाले होते. इस्पितळाने दिलेला त्यांचा मृत्यूचा दाखला अरबी भाषेत होता. त्याचे इंग्रजीत भाषांतर करताना जेद्दा येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकृत भाषांतरकाराने मृताचा धर्म चुकून ‘हिंदू’ऐवजी ‘मुस्लिम’ लिहिल्याने प्रेताचे तेथेच दफन केले गेले होते. अंजू शर्मा याचिकेत म्हणतात की, पार्थिव भारतात आणण्याची आम्ही तयारी सुरू केली तेव्हा दूतावासाकडून ही चूक झाल्याचे सांगण्यात आले. सौदी अरबस्तानच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुवा करून दफन केलेले पार्थिव कबरीतून पुन्हा बाहेर काढून भारतात पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना केली.
पण गेल्या सात आठवड्यांत त्यांच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही. पतीवर धार्मिक रिवाजांनुसार अंत्यसंस्कार न करता येण्याने आपला मूलभूत हक्क डावलला जात आहे, असे या विधवेचे म्हणणे असून सौदी अरबस्तानात दफन केले गेलेले आपल्या पतीचे पार्थिव पुन्हा उकरून भारतात आणण्याची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत व ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पार्थिव तेथे दफन केले गेले त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून कारवाई केली जावी, अशी त्यांची याचिकेत मागणी आहे.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला