
- साक्षी मलिकच्या बदनामी दाव्यात हायकोर्टाचा निकाल
मुंबई : ‘व्यंकटेश्वरा क्रिएशन्स प्रा. लि.’ या निर्माता कंपनीने तयार केलेल्या ‘व्ही’ या तेलगू चित्रपटात बॉलिबूड अभिनेत्री आणि मॉडेल साक्षी मलिक हिची काही स्थिर छायाचित्रे (Still Photographs) तिच्या संमतीविना आणि तेही तिची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारे वापरल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ’ ने त्यांच्या ‘स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म’वरून २४ तासांत काढून टाकावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
साक्षी मलिक हिने केलेल्या अब्रुनुकसानीच्या दिवाणी दाव्यात न्या. गौतम पटेल यांनी हा आदेश दिला. निर्मात्यांनी साक्षी मलिकची ती आक्षेपार्ह छायाचित्रे चित्रपटातून पूर्णपणे काढून टाकल्याखेरीज आणि न्यायालयाने परवानगी दिल्याखेरीज अॅमेझॉनला या चित्रपटाचे, कोणत्याही भाषेत व कोणत्याही ‘सब टायटल’सह प्रदर्शन करता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले. निर्मात्यांनी चित्रपपटातील साक्षीची ती आक्षेपार्ह स्थिर छायाचित्र ओळखता येऊ नयेत म्हणून ‘धूसर’ (ब्लर) करून भागणार नाही. त्या छायाचित्रांच्या अनुषंगाने चित्रपटात येणारी संपूर्ण चित्रमालिकाच (Picture Sequence) मूळ फिल्ममधून पूर्णपणे काढून टाकावी लागेल, असेही न्या. गौतम पटेल यांनी सांगितले.
न्या. पटेल यांनी निकालात म्हटले की, कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र त्याच्या संमतीविना जाहीर प्रदर्शनासाठी वापरणे हे तर मुळात बेकायदा आहेच. पण जेव्हा अशा छायाचित्राचा वापर त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारे केला जातो तेव्हा तर या बेकायदा कृत्याचे गांभीर्य अधिकच वाढते. त्यामुळे असा बेकायदेशीरपणा लक्षात आल्यावर तो तात्काळ थांबविणे हाच न्यायाचा मार्ग ठरतो.
चित्रपटात वापरलेली साक्षी मलिकची स्थिर छायाचित्रे तिच्या ‘इन्स्टाग्राम पोस्ट’वरून परस्पर उचलून चित्रपटात वापरण्यात आली. चित्रपटाच्या कथानकातील नायक वेश्यावस्तीत जाऊन एका पसंतीच्या वेश्येला सोबत घेऊन बाहेर पडतो, या प्रसंगाच्या चित्रमालिकेत पाठमोºया दिसणाºया वेश्येच्या जागी साक्षीची ही स्थिर छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. साक्षीचे वकील अॅड. अलंकार किरपेकर यांनी असे मुद्दे मांडले की, खासगी छायाचित्रांचा असा परवानगीशिवाय वापर करणे हा ‘प्रायव्हसी’चा भंग आहे. शिवाय ही छायाचित्रे ज्या संदर्भात व ज्या पद्धतीने वापरली गेली आहेत ती तर सरळसरळ बदनामी आहे. या मुद्द्यांशी सहमत होताना न्या. पटेल यांनी म्हटले की, या सर्व तथ्यांकडे अन्य कोणत्या दृष्टिने पाहिले जाऊ शकते, असे मला वाटत नाही.
व्यंकटेश्वरा क्रिएशन्सने असा बचाव केला की, या प्रसंगाच्या चित्रमालिकेत वापरण्यासाठी सुयोग्य छायाचित्रे मिळविण्यासाठी एका कमर्शियल एजन्सीसी करार केला होता. त्या एजन्सीने साक्षीची ही स्थिर छायाचित्रे आम्हाला दिली होती व ती कायेदशीरपणे वापरता येतील, अशी खात्रीही दिली होती. परंतु हे म्हणणे फेटाळताना न्या. पटेल यांनी म्हटले की, हे म्हणणे मनाला आणि सामान्य बुद्धीलाही न पटणारे आहे. कोणीही धंदेवाईक चित्रपट निर्माता अशा वेळी संबंधित व्यक्तीची संमती गेतली आहे ना, याची स्वत: खात्री करेल, हे अगदी उघड आहे.
न्यायालयाने म्हटले की, संबंधित प्रसंगाच्या चित्रमालिकेतून साक्षी मलिकचे ते छायाचित्र पूर्ण काढून टाकल्यानंतर निर्माता दुसरे छायाचित्र घालून त्या प्रसंगाचे चित्रिकरण पुन्हा फिल्ममध्ये घालू शकेल. मात्र असे करताना पुन्हा साक्षीचे कोणतेही छायाचित्र कोणत्याही स्वरूपात वापरले जाता कामा नये. अशा प्रकारे बदल केलेला चित्रपट निर्मात्याला साक्षीला आणि तिच्या वकिलांना आदी दाखवावा लागेल. तिचे समाधान झाले व न्यायालयाने परवानगी दिली तरच सुदारित चित्रपटाचे पुन्हा प्रदर्शन करता येईल, असेही न्यायालयाने सांगितले.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला