कंगना व तिच्या बहिणीवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश

प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल फिर्यादीची परिणती

Kangana Ranaut & Rangoli

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) व तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांनी केलेल्या प्रक्षोभक व आक्षेपार्ह अशा वक्तव्यांबद्दल फौजदारी गुन्हा नोंदवून तापस करावा, असा आदेश वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी जे. वाय.घुले यांनी दिला.

या दोन्ही बहिणींनी गेल्या काही दिवसांत ट्वीटरवर व  इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून मुनव्वर अली सैयद या नागरिकाने आधी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी दंडाधिकाºयांकडे खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली.या वक्तव्यांमुळे जनमानसात बॉलिवूडविषयी विकृत प्रतिमा तयार होते व समाजात वितुष्ट व वैराची भावना पसरते. शिवाय त्यामुळे माझ्या व माझ्या मित्रमंडळीच्या भावना दुखावल्या आहेत, असे सैयद यांचे म्हणणे आहे. खास करून कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे  ट्वीट हे विखारी असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

दंडाधिकारी घुले यांनी नमूद केले की, फिर्यादीत कंगना व रंगोलीविरुद्ध केलेले सर्व आरोप दखलपात्र गुन्हे या सदरात मोडणारे आहेत. त्यांचा तज्ज्ञांकडून तपास होण्याची तसेच गरज पडल्यास झडती व जप्ती यासारखी कारवाईही करणे गरजेचे ठरू शकेल. त्यामुळे वांद्र पोलिसांनी या फिर्यादीवर कायदेशीर कारवाई (म्हणजे रीतसर गुन्हा नोंदवून तपास) करावी असा आदेश मी देत आहे.

यामुळे या दोन बहिणींवर आता दोन भिन्न धामिक समाजांमध्ये वैर निर्माण करणे (भादंवी कलम १५३ ए), कुहेतूने धार्मिक भावना दुखावणे ( कलम २९५ ए), देशद्रोह (कलम १२४ए) व कट कारस्थान रचणे (कलम १२० बी) हे गुन्हे नोंदले जातील. यापैकी देशद्राहाचा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपही होऊ शकते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER