गुजरात गृहमंत्र्यांवर खटला चालविण्याचा आदेश रद्द

निवडणूक आचारसंहितेचे प्रकरण

Gujrat HC

अहमदाबाद : गुजरातचे सध्याचे गृहमत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अहमदाबादमधील असरवा मतदारसंघातून सन २००७ ची विधानसभा निवडणूक लढवीत असताना निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवून खटला चालविण्याचा दंडाधिकार्‍यांनी दिलेला आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केला. जडेजा यांची याचिका मंजूर करून न्या. इलेश व्होरा यांनी हा निकाल दिला.

ती विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच नवरात्र होती. नवरात्र मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये जडेजा यांनी स्वत:च्या प्रचाराची एक छापील पुस्तिका वाटून आचारसहितेचा भंग केला, अशी तक्रार त्या वेळचे अहमदाबाद शहर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पंकज शहा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी तशी फिर्याद  पोलिसांत नोंदविली. त्यावर दंडाधिकार्‍यांनी जडेजा यांना समन्स काढून खटला चालविण्याचा आदेश दिला होता.

ती फिर्यात व दंडाधिकाऱ्यांचा आदेश हे दोन्ही रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, जडेजा यांनी वाटलेली पुस्तिका आचारसंहितेत ज्याला प्रतिबंध केलेला आहे तशा प्रकारची मतदारांना प्रलोभने दाखविणारी पुस्तिका मुळीच नव्हती. त्या पुस्तिकेतील मजकूर पाहिला तर तिचा निवडणूक, प्रचार व मते मागण्याशी दूरान्वयानेही संबंध दिसत नाही. त्या पुस्तिकेत जडेजा यांचे छायाचित्र, त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह व अंबामातेच्या आरत्या छापलेल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER