राज्याच्या उपमहानिरीक्षकांना सेनगावकरांच्या चौकशीचे आदेश

- विशेष मोक्का न्यायालयाचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) 14 गुन्हे असताना 8 गुन्हे असल्याबाबतचा अहवाल देऊन मोक्का लावण्यास परवानगी दिल्या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तर सध्याचे मुुंबई रेल्वे आयुक्त रविंद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश विशेष मोक्का न्यायालयाने दिले आहेत.

विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्याचे उपमहानिरीक्षक यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ही बातमी पण वाचा : फुटीरतावाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या – खासदार नामग्याल

मोक्काच्या कलम 23 नुसार क्लॉज बीच्या सबसेक्शन 1 नुसार चौकशी करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर (रा. अशोक पथ, लॉ कॉलेज रोड) यांनी याबाबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सेनगावकर, दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी यांच्याविरोधात आरोप करणारी याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. सचिन लोंढे यांनी सांगितले, समर्थ पोलिसांनी दिपक मानकर आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांवर किती गुन्हे दाखल आहेत याचा अहवाल अतिरिक्त पोलिस आयुक्त सेनगावकर यांच्याकडे दाखल केला होता. त्यावेळी 14 गुन्हे दाखल असल्याचा अहवाल त्यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आठच गुन्हे असल्याचे नमूद करत मोक्का लावला. सहा गुन्हे लपवून ठेवले. यामुळे खटला कमकुकवत झाला. मोक्काच्या सेक्शन 3 खाली अशा पध्दतीने कोणी मदत केली तर त्यावरही मोक्का लावण्याची तरतूद आहे. दरम्यान, सेनगावकरांची सेक्शन 26 खाली चौकशी करण्याची मागणी याचिकेद्वारे न्यायालयात केली होती. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सेनगावकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.