बलात्कारपीडितेची ओळख हरतर्‍हेने गुप्त ठेवण्याचा आदेश

Rape Victim - High Court Order
  • माध्यमे, समाजमाध्यमे व कोर्टांवरही बंधने

औरंगाबाद : बलात्कारपीडित (Rape Victim) स्त्रिची तसेच लैंगिक अत्याचारास बळी पडणार्‍या  बालकांची केवळ नावेच नव्हेत तर त्यांची ओळख प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उघड होईल अशा प्रकारची कोणतीही माहिती वृत्तपत्रांनी, समाजमाध्यमांनी तसेच न्यायालयांनीही उघड करण्यास उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रतिबंध केला आहे.

एका बलात्कारपीडित मुलीच्या संगिता नावाच्या आईने केलेल्या याचिकेवर न्या. तानाजी नलावडे व न्या. एम.जी. सेवलीकर यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने हा आदेश दिला. बलात्कारपीडितेची ओळख उघड करण्यास दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २२८ अन्वये प्रतिबंध असूनही आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तसा आदेश दोन वर्षांपूर्वी दिलेला असूनही (निपूण सक्सेना वि. भारत सरकार) माझ्या मुलीचे नाव माध्यमांत उघड केले गेले, अशी या मातेची तक्रार होती.

खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांखेरीज आणखीही निर्देश दिले. हे निर्देश बलाक्कारपीडित स्त्री आणि बाल लैंगिक अत्याचर प्रतिबंधक कायद्याखालील (POCSO ACT) ने पीडित बालक या दोन्हींच्या बाबतीत आहेत. पीडित व्यक्तीचे नाव न देता अन्य माहिती दिल्यानेही तिची ओळख उघड होऊ शकते याचे भान माध्यमांनी ठेवावे आणि बातमी देण्याची कितीही घाई असली तरी अशी माहिती देण्याचे टाळावे, असे न्यायालयाने म्हटले.

कोर्टाने ठरविलेली मागदर्शिका

वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमांनी ही माहिती उघड करू नये:

-पीडित व्यक्तीच्या पालकांची अथवा नातेवाईकांची नावे.
-पीडित व्यकतीच्या पालकांचा अथवा नातेवाईकांचा नोकरी-व्यवसाय.
-पीडित व्यक्तीचे आरोपीशी असलेले नाते.
-पीडित व्यक्ती विद्यार्थी असेल तर तिच्या शाळा/ कॉलेज/ क्लासचे नाव व ठिकाण.
-पीडित व्यक्ती व आरोपीचे राहण्याचे, काम करण्याचे किंवा  व्यवसायाचे ठिकाण.

न्यायालये व पोलिसांसाठी

-पोलिसांनी आरोपीच्या रिमांड अर्जात किंवा त्यानंतरच्या तपासी अहवालांमध्ये पीडित व्यक्तीचे नाव न देता तिचा उल्लेख इंग्रजी ‘एक्स’ किंवा अन्य अद्याक्षराने करावा. पीडित व्यक्तीचे नाव, गाव. पत्ता वगैरे तपशील बंद लखोट्यात घालून न्यायालयाकडे द्यावा.

-आरोपीवर आरोप निश्चित करताना, कलम ३१३ अन्वये त्याचा जबाब नोंदविताना, साक्षीदारांची साक्ष नोंदविताना व खुद्द पीडित व्यक्तीची साक्ष नोंदवितानाही तिचे नाव किंवा ज्यावरून तिची ओळख स्पष्ट होईल, अशा कोणताही माहिती नोंदवू नये.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER