पायल रोहटगीच्या आक्षेपार्ह ट्वीट्सच्या तपासाचा आदेश

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहटगी (Payal Rohatgi) हिने गेल्या डिसेंबरमध्ये मुस्लिम महिला व एकूणच मुस्लिम धर्मात असलेल्या लैंगिकतेसंबंधीच्या प्रथांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीट्सवरून दाखल झालेल्या फौजदारी फिर्यादीवर महानगर दंडाधिकार्‍यांनी तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. पायलने या ट्वीट्स  खास करून तेव्हा दिल्लीतील दंगलीच्या संदर्भात कोठडीत असलेली विद्यार्थी कार्यकर्ती सफूरा झरगर हिला उद्देशून केल्या होत्या.

या ट्वीट्सबद्दल पायलविरुद्ध समाजाच्या दोन वर्गांमध्ये वितुष्ट निर्माण करणे व धार्मिक भावना दुखावणे या गुन्ह्यांसाठी खटला चालवावा, अशी फिर्याद अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी केली आहे. त्यावर अंधेरी येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी भागवत टी. झिरपे यांनी अंबोली पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला.

प्रत्येक धर्माच्या अनुयायांना आपापल्या धर्माचे अनुसरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. समाजातील इतर वर्गातील लोकांच्या धार्मिक प्रथा व क्रीयाकर्मांची टर उडविण्याचा अधिकार कोणालाही नाही. आरोपीच्या संदर्भित ट्वीट्सवरून मुस्लिम महिला व त्या समाजाच्या भावनांविषयीचा तिचा अनादर सकृद्दर्शनी दिसतो, असे दंडाधिकारी झिरपे यांनी आदेशात नमूद केले.

अ‍ॅड. देशमुख यांनी भारतीय दंड विधानाखेरीज माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वयेही खटला चालविण्याची विनंती केली आहे. परंतु त्या कायद्याच्या कलम ६५-बी नुसार त्यासाठी आवश्यक असे प्रमाणपत्र त्यांनी फिर्यादीसोबत जोडलेले नाही. त्यामुळे त्या आक्षपार्ह ट्वीट्स खरंच आरोपीने केल्या होत्या का याची तांत्रिक शहानिशा करण्यासाठी तपास करण्याची गरज आहे, असेही दंडाधिकार्‍यांनी  म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button