स्त्रीलंपट वकिलाची मानसिक तपासणी करण्याचा आदेश

Madhya Pradesh High Court

महिला न्यायाधीशास पाठविला अश्लिल संदेश

इंदूर :- एका महिला न्यायाधीशाला वाढदिवसानिमित्त अश्लिल आशयाचे शुभेच्छा संदेश पाठविणार्‍या आणि एरवीही तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करणार्‍या विजय सिंग यादव (Vijay Singh Yadav) नावाच्या वकिलाची मानसिक तपासणी करण्याचा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (Madhya Pradesh High Court) इंदूर खंडपीठाने दिला.

विजय सिंग यादव रतलाम येथील जिल्हा न्यायालयात वकिली करतो. महिला न्यायाधीशाने पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर फेब्रुवारीमध्ये यादव यास अटक झाली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणीत न्या. रोहित आर्य यांनी हा आदेश देऊन पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली

न्या. आर्य यांनी असे नमूद केले की, ३७ वर्षांचा यादव विवाहित असून व त्याला चार मुले असूनही त्याने व्हॉट्सअ‍ॅप व अन्य समाजमाध्यमांतून महिला न्यायाधीशाला संकोच वाटेल असे वकिलास अशोभनीय वर्तन केले आहे. त्यामुळे त्याची मानसिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे वाटते.

ही तपासणी करण्यासाठी गरज पडल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांची मदत घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले.
या महिला न्यायाधीशाने केलेल्या तक्रारीनुसार तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मध्यरात्री यादव याने तिला तिच्या सरकारी ई-मेल अ‍ॅड्रेसवर अर्वाच्य भाषेत शुभेच्छा संदेश पाठविला. एवढेच नव्हे तर यादवने या महिला न्यायाधीशाच्या फेसबूक पेजवरून तिचा फोटो घेऊन आणि तो फोटो आपल्या फोटोसोबत चिकटवून एक शुभेच्छा कार्ड तयार केले व ते या महिला न्यायाधीशाच्या न्यायालयास ‘स्पीड पोस्ट’ने पाठवून दिले.

याशिवाय यादव न्यायालयात व न्यायालयाच्या आवारात आपल्याशी बाष्कळ बोलून सलगी करण्याचा प्रयत्न करतो, असाही त्या महिला न्यायाधीशाचा आरोप आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button