कोल्हापूर महापालिकेच्या माजी आयुक्तांवर अटकेची कारवाई करण्याचे आदेश

KMC

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्यात चालढकल आणि बांधकाम व्यावसायिकाला विनाकारण त्रास दिल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन दोन आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, शहर अभियंता यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पी. शिवशंकर,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, मारुती राठोड, निवृत्त उपशहर अभियंता एस. के.माने, संजीव देशपांडे यांचा समावेश आहे. या प्रकरणी भूषण जयंतीलाल गांधी यांनी दावा दाखल केला होता.

कोल्हापुरातील जवाहर नगर इथल्या ६२३ अ/४ या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकानं ले आऊट मंजुरीची मागणी केली होती. पण तिथल्या प्रस्तावित डीपी रोडवर असणारी अतिक्रमणे काढून त्यांचं पुनर्वसन करण्याची अजब अट घालून, त्या ले आऊटला मंजुरी देण्यात आली. त्या वेळी विजयालक्ष्मी बिदरी महापालिकेच्या आयुक्त होत्या. तीन- चार कुटूंबांची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकानं मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतली. मात्र त्याचा गैरफायदा घेत, स्थानिक स्वयंघोषित नेत्यांनी पुनर्वसन पराप, असा अट्टाहास सुरू केला. त्याला नकार देताच, महापालिका प्रशासनानं बांधकाम व्यावसायिकालाच त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी ले आऊट रद्द केला.

या सर्व प्रकाराविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, तत्कालीन सहाय्यक नगररचनाकार धनंजय खोत, मारूती राठोड, निवृत्त महापालिका उप शहर अभियंता एस. के. माने, संजीव देशपांडे यांच्या विरोधात हा दावा दाखल आहे. सध्या न्या. एस. एस. राऊल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर अद्याप आपलं पूर्ण म्हणणं सादर केलं नाही किंवा आपली बाजू व्यवस्थित मांडलेली नाही. तसंच आयपीसी २१७ आणि २१८ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल न्यायालयानं या ७ जणांविरोधात अटक वारंट काढले आहे.

२९ जानेवारी २०२० रोजी या सर्वांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे वॉरंट बजावण्यात आले आहेत. हे सर्व वॉरंट जारी झाले आहे. घडल्या प्रकाराने महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.