पेन्शनर पत्नीने पतीला ‘खर्ची’ देण्याचा आदेश

हिंदू विवाह कायद्याच्या आधारे निकाल

पेन्शनर पत्नीने पतीला ‘खर्ची’ देण्याचा आदेश

मुजफ्फनगर : पत्नीने पतीला दरमहा ‘खर्ची’ (Maintenance) म्हणून ठराविक रक्कम देण्याचा आदेश उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील कुटुंब न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणातील पती व पत्नी गेली अनेक वर्षे विभक्त राहात आहेत. पत्नी सरकारी पेन्शनर आहे. आपल्याला चरितार्थाचे काहीच साधन नसल्याने पत्नीने आपल्याला दरमहा ‘खर्ची’ म्हणून रक्कम द्यावी, असा अर्ज पतीने केला होता. तो कुटुंब न्यायालयाने मंजूर केला. पत्नीला दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळते हे लक्षात घेऊन तिने पतीला ‘खर्ची’पोटी एक हजार रुपये द्यावेत, असा आदेश देण्यात आला.

सर्वसाधारणपणे जिचा पती सांभाळ करत नाही किंवा जी पटत नाही म्हणून वेगळी राहते अशी पत्नी पतीकडून ‘खर्ची’ व पोटगीसाठी अर्ज करते व न्यायालयात तसे आदेश देते. त्यामुळे पत्नीने पतीला ‘खर्ची’ देण्याचा आदेश विरळा असला तरी तो कायद्याला धरूनच आहे.

सन १९५५ च्या हिंदू विवाह कायद्याच्या (Hindu Marriage Act) कलम २४ मध्ये अशा प्रकारे ‘खर्ची’ देण्याची व कलम २५ मध्ये कायमस्वरुपी पोटगी देण्याची तरतूद आहे. यासाठीचे अर्ज पती व पत्नी यापैकी कोणीही करू शकतात. सर्वसाधारणपणे घटस्फोटाचा दावा प्रलंबित असताना अंतरिम व्यवस्था म्हणून असा ‘खर्ची’चा आदेश दिला जातो व घटस्फोट मंजूर करताना कायमस्वरूपी पोटगीचा (Pemenent Alimoney)आदेश दिला जातो. दाम्पत्यापैकी दोघांचीही सांपत्तिक स्थिती लक्षात घेऊन न्यायालय हे आदेश देते.

राजस्थान, केरळ व मध्य प्रदेश उच्च न्यायालयांनी यासंदर्भात काही महत्वाचे निकाल दिले आहेत. त्या निकालांचा मतितार्थ असा की, कायद्याने पतीलाही पत्नीकडून ‘खर्ची’ व ‘पोटगी’ मागण्याचा हक्क दिला असला तरी त्यासाठी पती खरोखरच स्वकमाई करून चरितार्थ चालविण्यास असमर्थ असायला हवा. पतीने काहीही कामधंदा न करता नुसते घरी बसून राहून किंवा असलेला कामधंदा मुद्दाम सोडून देऊन कमावत्या पत्नीकडे ‘खर्ची’ किंवा पोटगी मागणे कायद्यास अभिप्रेत नाही.

थोडक्यात हिंदू विवाह कायदा असे सांगतो की, परस्परांचा सांभाळ करण्याची व दोघांपैकी एक अक्षम असेल तर त्यास दुसर्‍याने मदत करण्याची जबाबदारी पती व पत्नी दोघांवरही आहे. शिवाय काही कारणांनी वैवाहिक संबंध संपुष्टात आले तरी ही जबाबदारी संपतेच असे नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER