मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी ‘ऑरेंज अलर्ट’

Dark Clouds

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाला असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला आणि सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात ११ ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १२ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १३ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल.

१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी ७० कि. मी. वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील; म्हणून मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असतानाच शनिवारी सकाळी मुंबईत आकाश स्वच्छ होते. दुपारी कडक ऊन पडले होते. दुपारी २-३ नंतर मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात पावसाचे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. ४ वाजताच्या सुमारास अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला होता. मुंबईजवळील भागात ढगांचा गडगडाट सुरू होता. काही ठिकाणी पाऊस सुरू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER