
मुंबई : सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे, अशी रोखठोक भूमिका घेत आज वर्षभर काँग्रेससारख्या (Congress) ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय?, हा भ्रम कायम असल्याचं म्हणत शिवसेनेने (Shivsena)आजच्या सामनातून काँग्रेसवर खोचक टीका केली आहे.
आजचा सामनातील अग्रलेख…
राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेला एक महिने बळीराजा आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे. सत्ताधारी भाजपने त्यांची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. विरोधी पक्षही बळीराजाची बाजू सरकारजवळ मांडण्यात पूर्णपणे यशस्वी झाला नाही. अशा परिस्थितीत सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत, अशी भूमिकाच शिवसेनेने आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून घेतलेली आहे.
“राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करीत असतात. त्यांची मेहनत वाखाणण्यासारखी आहे. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, मायावतींचा बसपा, अखिलेश यादव, आंध्रात जगन यांची वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील चंद्रशेखर राव, ओडिशाचे नवीन पटनायक, कर्नाटकचे कुमारस्वामी असे अनेक पक्ष व नेते भाजपविरोधात आहेत. पण ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएत सामील झालेले नाहीत. हे सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत”, असं मत शिवसेनेनं मांडलं आहे.
“आज वर्षभर झाले काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत व काँग्रेसचे हंगामी नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत डोलारा चोख सांभाळला आहे, पण त्यांच्या भोवतीचे जुनेजाणते नेते आता अदृश्य झाले आहेत. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासारखे जुनेजाणते पुढारी काळाच्या पडद्याआड गेले. अशा वेळी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यूपीएचे भविष्य काय, हा भ्रम कायम आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“सध्या एनडीएत कोणी नाही तसे यूपीएतही कोणीच नाही, पण भाजप पूर्ण बळाने सत्तेवर आहे व त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखे भक्कम नेतृत्व व अमित शहांसारखे राजकीय व्यवस्थापक आहेत. तसे यूपीएत कोणी दिसत नाही”, असंही आवर्जून अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
“लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळवावे इतके संख्याबळ नाही. नुकतीच बिहारची विधानसभा निवडणूक झाली. त्यातही काँग्रेसची घसरगुंडी उडाली. हे सत्य झाकता येणार नाही. तेजस्वी यादव या तरुणाने जी झुंज दिली ती जिद्द काँग्रेस नेतृत्वाने दाखवली असती तर बिहारचे चित्र कदाचित बदलले असते”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
“प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. कमलनाथांचे मध्य प्रदेश सरकार स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पाडल्याचा स्फोट भाजप नेते करतात. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष! देशासाठी हे चित्र बरे नाही. काँग्रेस नेतृत्वाने सारासार विचार केला नाही तर येणारा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे, अशी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल, अशी भूमिका शिवसेनेनं सरतेशेवटी मांडली आहे.
ही बातमी पण वाचा : पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर काँग्रेस अस्वस्थ, वरिष्ठ नेत्याने दिला इशारा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला