महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सत्ताबदलासाठी विरोधक घेणार शरद पवारांची मदत?

SHarad Pawar.jpg

पाटणा :- बिहारमध्ये नव्या वर्षात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मदत घेण्याचा विचार विरोधक करु लागलेले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी म्हणाल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सातपैकी सहा आमदार फोडले. बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपनं दिलेला धक्का नितीश यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे राजदनं नितीश यांना पुन्हा महागठबंधनमध्येसामील करुन घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये अरुणाचल प्रदेशची पुनरावृत्ती करू शकतो, असं राबडीदेवी म्हणाल्या. जेडीयूला सोबत घेऊन राज्यात सत्तांतर घडवण्याचा राजदचा प्रयत्न आहे. त्यासाठी खुद्द लालू प्रसाद यादव कामाला लागले आहेत. नितीश कुमार यांना लक्ष्य करू नका, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं राजकारण नितीश यांना पटलेलं नाही.

नितीश कुमार यांना महागठबंधनमध्ये सामील करुन घेण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमधील (यूपीए) काही नेतेदेखील कामाला लागल्याची चर्चा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही मदत घेतली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं केलेलं फोडाफोडीचं राजकारण ही राजदसाठी सुवर्णसंधी आहे आणि नितीश यांच्यावर टीका करून ती गमावू नका, असा सल्ला लालूंनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER