विरोधकांनी मेगागळतीची चिंता करावी : मुख्यमंत्री

CM

नवी मुंबई :- विरोधकांनी भाजपमध्ये होत असलेल्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या ‘मेगागळती’ची चिंता करावी. थोडे आत्मचिंतन करावे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना
लगावला. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला चांगल्याच जागा मिळतील, कमी जागा मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, काहींना आमच्याकडे सुरू असलेल्या मेगाभरतीची चिंता लागली. मात्र त्यांनी त्याची चिंता करू नये. त्यांच्याकडे मेगागळती का सुरू झाली, याचे थोडे आत्मचिंतन करावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही सत्तेत आलो आहेत. त्यामुळे आम्ही यापुढेही विकासाची कामे करतच राहणार. आम्ही उतणार नाही. मातणार नाही. सत्तेची माजोरी आणि मुजोरीही दाखवणार नाही, अशी हमी देतानाच पुन्हा सत्तेत आल्यावर एकही राज्य महाराष्ट्राच्या स्पर्धेत राहणार नाही, असा महाराष्ट्राचा विकास करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.