आता विरोधकांचीही इच्छा, ‘गडकरी पंतप्रधान व्हावेत !’

मुंबई :- मागील दोन-तीन महिन्यांपासून देशभरात कोरोनामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र अशा संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशाकडे दुर्लक्ष केले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) पंतप्रधान असायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी खतांचे वाढलेले दर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नितीन गडकरी यांनी कोरोना लसीच्या वाढत्या मागणीवरून १० कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून नाना पटोले यांनी टोमणा लगावला.

नाना पटोले म्हणाले, मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही; पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत, पण मोदींना त्याची काळजी नाही. भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की, महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होत आहे. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले. केंद्र सरकारने दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिलं नाही. उलट कोरोना संपला असं सांगण्यात आलं. त्याचे परिणाम काय झाले हे आपण पाहिलं, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

कोरोना महामारीत लोकांचा जीव गेला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला दाम दुप्पट देऊ असं मोदी म्हणाले; पण आज शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजली, असं नाना पटोले म्हणाले. चक्रीवादळामुळे गुजरातचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही खूप नुकसान झाले आहे. त्यांनी महाराष्ट्राचाही दौरा करायला हवा होता.

प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कंट्रोल रूममधून परिस्थितीवर लक्ष आहे. प्रशासनावर ताण नको म्हणून आम्हीही उशिरा बाहेर पडत आहोत, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनाही नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी ४०० जागा जिंकतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर नाना पटोले म्हणाले, तत्काळ निवडणुका घ्या, कोण किती ठिकाणी विजयी होते ते बघा.

ही बातमी पण वाचा : खत दरवाढीविरोधात घंटानाद आंदोलन करू; नाना पटोलेंचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button