सनबर्न उत्सवाला सनातनचा कडाडून विरोध

sanatan logo

पुणे : राज्य पर्यटन विभागाद्वारे परवानगी देण्यात आलेल्या सनबर्न उत्सवाचा सनातन संस्थेने जोरदार विरोध केला आहे. सनबर्नकडून करचुकवेगिरी करण्यात आली असून, या उत्सवा मध्ये अंमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचा आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. पुण्यातील केसनंदमध्ये २८ डिसेंबरपासून सनबर्न उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेने सनबर्नला कडाडून विरोध केला असला तरी राज्याच्या पर्यटन विभागाने या उत्सवाला पाठिंबा दर्शविला आहे.

‘संतांच्या भूमीत असला उत्सव होऊ देणार नाही,’ अशी भूमिका सनातन संस्थेने घेतली आहे. ‘याआधी गोव्यात सनबर्न उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न उत्सवाच्या आयोजकांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजन करताना उत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, हे लिखित स्वरुपात कबूल करुन घ्या,’ असे सनातन संस्थेने म्हटले आहे.

यापूर्वी अनेकदा गोव्यात सनबर्न उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सनबर्नच्या आयोजकांनी गोवा सरकारला कर न भरल्याचा आरोपदेखील सनातनकडून करण्यात आला. मात्र गोवा सरकारला कर भरण्यात आल्याचे सनबर्नच्या आयोजकांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे सेवन केले जात नसल्याचेदेखील आयोजकांनी म्हटले आहे.

दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सनबर्न उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. खाद्य, संगीत आणि मनोरंजन ही सनबर्न उत्सवाची संकल्पना असून, एका तिकीटाची किंमत दोन हजार रुपये आहे.