संकटात संधी…

industrial clusters
  • देशात नऊ औद्योगिक क्लस्टर उभारले जाणार
  • नोएडा, हैदराबाद, चेन्नई बरोबरच औरंगाबाद, पुण्याचाही नंबर

औरंगाबाद : सध्या उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीत औद्योगिक क्षेत्राला नवीन संधी प्राप्त झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर ही योजना सुरु केली आहे. तसेच देशात १० शहरांमध्ये नऊ औद्योगिक क्लस्टर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिल्ली पासून तर हैदराबाद पर्यंत या हबची निर्मिती होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि औरंगाबादचाही नंबर लागला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी कंपनी जेएलएल कडून या नऊ शहरांची नावे पुढे आली आहेत. नॅशनल इनव्हेस्टमेंट प्रमोशन फॅसिलिटेशन एजन्सी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

औरंगाबादच्या क्लस्टरला मुंबई – औरंगाबाद न्यु इंडस्ट्रील बेल्ट असे नाव देण्यात आले आहे. लघु उद्योगासाठी औरंगाबादेत दहा हजार एकर जागा सध्या उपलब्ध आहे. या ठिकाणी हे क्लस्टर उभा राहू शकते. ऑटोमोबाईल, औषध व त्यासाठी पुरक कंपन्या, अल्युमिनियम आणि अक्षय उर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याना या क्लस्टरमध्ये प्राधान्य आहे. तर पुण्यात ऑटोमोबाईल उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आणि प्रामुख्याने आयटी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. देशात सर्वाधिक आयटी एक्सपोर्ट हा पुण्यातून होतो. त्या उद्योगाला या क्लस्टरच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. या दोन्ही क्लस्टरमध्ये तयार होणारा माल हा देशात आणि परदेशात पाठवणे सोपे आहे. औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही एमआयडीसीत पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. शिवाय हवाई आणि समुद्री मार्गातून वाहतूक करणे या दोन्ही एमआयडीसीला शक्य आहे. त्यामुळे राज्यातील या दोन शहराची निवड करण्यात आली असल्याचे तज्ञांचे मत आहे.

इतर शहरे : औरंगाबाद पुणे या बरोबरच देशात एन एच ४८ गुरुग्राम भिवडी निमराना कोरीडोअर, नोएडा एक्सप्रेस वे, बेंगरुळू, चेन्नई, हैदराबाद, अहेमदाबाद, वडोदरा या शहरांमध्ये हे हब उभे रहाणार आहेत. सध्या गुजराथ, तेलंगणा, तामिळनाडू हे राज्य त्यांच्याकडे कंपन्यांना आकर्षीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष अधिकाऱ्यांची टिम देखील तयार केली आहे. असेच प्रयत्न महाराष्ट्राकडून देखील होणे अपेक्षीत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला